अखेर बीकेसी पार्किंगला वाली मिळाला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई – बीकेसी, जी ब्लॉकमधील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या तीन पार्किंगला अखेर वाली मिळाला आहे. तीन पार्किंगसाठी दोन कंत्राटदारांची नियुक्ती करत त्यांना ऑफर लेटर देण्यात आले असून लवकरच या तिन्ही पार्किंगचा ताबा कंत्राटदारांना देण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीचे उपमहानगर अायुक्त अनिल वानखेडे यांनी दिली आहे. त्यामुळे आता बीकेसीतील पार्किंगचा प्रश्न एका वर्षासाठी तरी मार्गी लागला आहे.

आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या बीकेसीतील जी ब्लॉकमध्ये नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या - जाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. असं असताना येथील जागेवरील पार्किंग फेब्रुवारीमध्ये अचानक बंद करण्यात आल्याने येथील नोकरदारांची मोठी पंचायत झाली होती. कंत्राटदार नसल्याने पार्किंग बंद करण्यात येत असल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले गेले असले तरी नजीकच्या रिलायन्स जीओ पार्किंग चालावे, यासाठी हा घाट एमएमआरडीएने घातल्याचा आरोप बीकेसी पार्किंग इश्यू ग्रुपने केला होता. रिलायन्स जीओ पार्किंग खूपच महागडे असल्याने या ग्रुपने रस्त्यावर उतरत याचा विरोधही केला होता. तर ‘मुंबई लाइव्ह’ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत हे प्रकरण उचलून धरले होते.

‘मुंबई लाइव्ह’च्या बातमीनंतर एमएमआरडीएने पार्किंग सुरू केले आणि तेही मोफत. तर दुसरीकडे कंत्राटदारासाठी निविदाही मागवल्या. या निविदेनुसार एस एस. एन्टरप्रायझेस आणि अख्तर एन्टरप्रायझेस या दोन कंत्राटदारांना तीन पार्किंगचे कंत्राट देण्यात आले आहे. एका वर्षासाठी हे कंत्राट असणार आहे. त्यामुळे आता मोफत पार्किंग बंद होणार असून पालिकेच्या दराप्रमाणे शुल्क आकारत पार्किंग चालवण्यात येणार असल्याचंही वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. पार्किंगचा प्रश्न निकाली निघाल्याने आता बीकेसीतील वाहनचालक-प्रवाशांना दिलासा मिळणार हे नक्की.

पुढील बातमी
इतर बातम्या