Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढचे काही तास धोक्याचे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसाने गुरुवार सकाळी चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईतील काही सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक संथ गतीने सुरु आहे, तर रस्ते वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. पावासाचा जोर आणखीन वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून निघताना खबरदारी घ्यावी. 

याशिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरीवली येथील सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने, पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या 5 ते 10 मिनिटं विलंबाने, तर हार्बर रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे.

मुंबई तसेच महामुंबईच्या उर्वरित भागात, नवी मुंबईमध्ये दिवभरात 10 ते 20 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. मुंबईतील सांताक्रूझ केंद्रावर 6.9, तर कुलाबा येथे 2.5 मिलीमीटर पाऊस सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या कालावधीत झाला.

उत्तर मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यानंतर भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अॅलर्ट केला. ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला. पालघर जिल्ह्यामध्ये रेड अॅलर्ट देण्यात आला असून, डहाणू केंद्रावर सकाळी 8.30 ते सायं. 5.30 पर्यंत 59.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

उत्तर मुंबईत दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, चिंचोली या पट्ट्यामध्ये तसेच ठाण्यात अनेक ठिकाणी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत 40 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. तर डोंबिवली पश्चिम, कल्याण येथे दोन ते तीन केंद्रांवर या कालावधीत 70 मिलीमीटरहून अधिक म्हणजे मुसळधार पाऊस नोंदला गेला.


हेही वाचा

मुंबई : 'मेट्रो 3'च्या कामामुळे आरेतील रस्त्याची दुरवस्था

बोरिवली रेल्वे स्थानकावर तिकीट तपासकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या