सध्या मुंबईतील वातावरण विदेशासारखं अनप्रडीक्टेबल बनलं आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत जणू उष्मा आणि थंडीची रस्सीखेच सुरू आहे. रविवारी आणि सोमवारी उन्हाचे चटके सहन करणाऱ्या मुंबईकर मंगळवारी रात्रीपासून पुन्हा गारवा अनुभवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात बरेच बदल होत असून, कडाक्याची थंडी, त्यानंतर ऊन आणि आता दिवसा सुटणारे गार वारे यामुळे मुंबईचा पारा वर-खाली होत आहे. सध्या मुंबईच्या तापमानात चांगलीच घट झाली आहे. दिवसा मुंबईचा पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.
शुक्रवारी मुंबई परिसरात सकाळपासूनच गार वारे वाहू लागले. त्यामुळं मुंबईत सांताक्रुझ परिसरात १२ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली आहे. तसंच कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं असून, बोरिवली नॅशनल परिसरात ११ अंशापेक्षा कमी तापमान असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यंदा थंडीच्या मोसमात पहिल्यांदाच जवळपास दोन ते तीन वेळा तापमान १२ ते १३ अंशावर घसरलं असल्यानं मुंबईकरांनी कडाक्याची थंडी अनुभवली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यान मुंबईत दिवसा पश्चिम आणि वायव्य दिशेकडून, तर रात्रीच्या वेळी पूर्व दिशेकडून गार वारे वाहत होते. मात्र सोमवार आणि मंगळवारी वाऱ्यांच्या दिशेत बदल झाल्यानं मुंबईत उष्ण वारे वाहू लागले; परंतु बुधवारपासून पुन्हा एकदा उत्तर ते वायव्य पट्ट्यातून गार वारे वाहण्यास सुरूवात झाल्यानं मुंबईकर दिवसा गारवा अनुभवत आहेत. इतकंच नव्हे तर, दिवसा मुंबईत ढगाळलेलं वातावरण असून, येत्या ४८ तासात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
मादाम तुसॉमध्ये प्रियांकाचा चौकार