मुंबईकरांची कोरोना डेल्टा व्हेरीयंटवर मात!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरणाचा फायदा होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. ५० टक्के डेल्टा व्हेरीयंट असूनही गंभीर रुग्णाचं प्रमाण कमी आहे. मुंबईत डेल्टा व्हेरीयंटचा प्रभाव जवळपास संपुष्टात येत असल्याचं समोर आलं आहे.

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग करणारी वैद्यकीय यंत्रणा महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेनं आतापर्यंत दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.

तिसऱ्या तुकडीमध्ये एकूण ३४३ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं या निष्कर्षांवरून आढळत आहे.

निष्कर्षानुसार, ३४३ पैकी १८५ रुग्ण (54 टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर ११७ रुग्ण (34 टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूनं बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये इतर प्रकारांचे ४० बाधित रुग्ण (१२ टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे.

डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेनं सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण / प्रसार वेग देखील कमी असल्याचं आढळलं आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, पहिला डोस घेतलेल्या ५४ नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त ७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. ५४ पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसंच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

दोन्ही डोस घेतलेल्या १६८ नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त ४६ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यातही अवघ्या ७ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही.


हेही वाचा

उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवण्यास हिरवा कंदील

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालय सुरू, ‘या’ आहेत गाईडलाईन्स

पुढील बातमी
इतर बातम्या