ते पाच दिवस…

कधी नव्हे तो नालासोपारा जलमय झाला. नालासोपाऱ्यात पावसाचं पाणी तुंबणं हे तसं नवीन नाही. नावातच नाला आहे, म्हणजे पाणी तुंबणारच. आतापर्यंत पूर्वेला पाणी तुंबायचं. पण पश्चिमेला एवढ्या मोठया प्रमाणात पाणी तुंबणं हे मागील १८ वर्षाँमध्ये पहिल्यांदाच घडत होतं. रविवारचा मुहूर्त पकडून पावसानं बरसायला सुरुवात केली. हा मुहूर्तच अशुभ होता की काय? असा प्रश्न आता पडू लागलाय. पाऊस पडत होता तोही डोळे बंद करून. जणूकाही ढगफुटीच होतेय की काय, असा प्रश्न सर्वांना पडत होता.

आठवणींचा फ्लॅशबॅक

सलग ३ दिवस मुसळधार पाऊस पडत होता. त्याक्षणी सर्वांच्या मनात २६ जुलैच्या आठवणींचा फ्लॅशबॅक सुरु झाला. भलेही २६ जुलैच्या महाप्रलयाचा तडाखा नालासोपारा, वसई आणि विरारला बसला नसला, तरी आज या भागात राहायला आलेली कुटुंबं मुंबईतून स्थलांतरीत झाल्याने बहुतेक जणांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

पाण्याचा रास्ता रोको

रविवारी सकाळी पाणी जमा होण्यास सुरुवात झाली तेव्हा हे पाणी सोमवारी निघून जाईल, या विचारात रात्री सर्व झोपी गेले. पण सोमवार उजाडल्यावर त्यांना धक्काच बसला. पाणी निघून जाण्याऐवजी वाढलेलंच होतं. या वाढलेल्या पाण्याने रेल्वे रुळांवरही हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. रेल्वे रुळांवर वाढणाऱ्या या पाण्याने आधी वाहतूक विस्कळीत केली अन् नंतर पूर्ण ठप्पच करून टाकली. आजवर राजकीय पक्ष रेल रोको करत गाड्या अडवायचे. परंतु पाण्यानेच रेल्वे बंद करून टाकली.

आधीच पावसामुळे अनेकांना घराबाहेर पडण्याचा कंटाळा आला होता. तरीही कामाला जायचं असल्यानं स्टेशन गाठलं. पण गाड्यांनी मार्ग रोखल्याने गुडघाभर पाण्यातून पुन्हा परतीचा मार्ग स्वीकारत अनेकांनी घर गाठलं. तेव्हापासून नालासोपाराकर जसे घरांमध्ये अडकले ते थेट गुरुवारपर्यंत.

बत्ती गूल

सोमवारच्या पाण्याच्या पातळीच्या तुलनेत मंगळवारी पाण्याची पातळी दीड ते पावणे दोन फुटांनी वाढली. शेअर्स बाजाराने उसळी मारावी तशी पाण्याची पातळी वाढली होती. मी दुसऱ्या मजल्यावर राहत असल्याने इमारतीखालील रस्त्यांवर तुंबलेल्या या पाण्याचं आणि त्यातून जाणाऱ्याचं निरिक्षण करण्याशिवाय मला काहीच धंदा नव्हता. पाण्याने आमच्या मीटर बॉक्समध्ये शिरकाव केल्यामुळे सोमवारीच बत्ती गूल झाली होती. त्यानंतर घरातील इन्व्हर्टरनेही मध्यरात्री जीव सोडला.

मोबाईलही तसा व्हेंटिलेटरवरच होता. त्याला व्हाॅट्सअपचा संसर्गही होऊ दिला जात नव्हता. कारण जेमतेम ७ ते ८ टक्के बॅटरी व्हाॅट्सअॅप क्षणात गिळणार हे ठरलेलंच होतं. पण मोबाईलची बॅटरी वाचवण्यापूर्वीच नेटवर्कने मान टाकली. मंगळवारी मोबाईलनेही मान टाकली आणि जगापासून संपर्कच तुटला तो पुढे गुरुवारपर्यंत. ना संपर्काचं साधन होतं ना छायाचित्रणाचं. त्यामुळे त्याला एका कोपऱ्यात फेकून दिलं.

तुंबणं अन् साचणं

संपर्क आणि संवादाची सर्व माध्यम ठप्प झाल्यानं खिडकीत बसून पाण्याकडे पाहत पाण्याच्या पातळीचा माग घ्यायचा हाच दिनक्रम उरला. डोळयाची फूटपट्टी करत पाण्याचा पातळीचं मोजमाप सुरु असायंच. बुधवारी पावसानं दांडी मारली. पण दिवसभरात पाऊस न पडूनही पाण्याची पातळी ८ ते ९ इंचापेक्षा कमी झाली नव्हती.

पाणी जागच्या जागीच खिळलं. पाण्यातल्या वस्तूही माझं लक्ष वेधून घेत होत्या. त्याही जागीच अचल होऊन पडल्या होत्या. या तरंगणाऱ्या वस्तूंकडे पाहता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विधानाची आठवण झाली आणि हे पाणी साचलंय की तुंबलंय हा प्रश्न माझाला मनाला शिवत होता. या पाण्यामुळे तुंबणं आणि साचण्यामधला फरक कळला. साचलेल्या पाण्याचा निचरा होतो, पण तुंबणाऱ्या पाण्याचा नाही.

रामसे बंधूचा सिनेमाची आठवण 

वीज बंद, मोबाईलही बंद. संपर्क आणि संवादाचा माध्यमच राहिलेलं नव्हतं. शेजाऱ्या पाजाऱ्यांशी संवाद तेवढाच उरला होता. या रस्त्यापलिकडं काय चाललंय हे कळत नव्हतं. दिवसा आजूबाजूला पाहून दिवस निघून जायचा. पण रात्रीचं जीणं नकोसं वाटायचं. वीज नसल्याने पंखा, एसी बंद. खिडक्या उघडया ठेवाव्यात तर डासांची भीती. हवेची एखादी झुळूक लागावी यासाठी जीव आतूर असायचा.

सोमवारी रात्री पाऊस पडत असल्याने तेवढा काही त्रास जाणवला नाही. पण मंगळवारी रात्रीपासून पुढच्या सर्व रात्री या ‘गरमी का एहसास’ देणाऱ्याच होत्या. झोप येता येत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर तळमळ सुरु असायची. तरीही डोळयाला डोळा काही लागेना. अधूनमधून मध्येच उठून खिडकीतून खाली डोकावून बॅटरी मारत किरकिऱ्या डोळ्यांनी पाण्याचा पातळीचा अंदाज घेणं सुरुच असायचं.

आधीच झोप येईना. त्यातच कुत्र्यांचं रडणं. भुंकणं. सर्व परिसरात अंधारात गडप झाला होता. या काळ्याकुट्ट अंधारातील कुत्र्यांचं रडणं म्हणजे रामसे बंधुंच्या भयाण चित्रपटासारखं भासायचं. मध्येच गायी देखील हंबरडा फोडायचं. कुत्र्यांचं रडणं हे अशुभ मानलं जात असलं तरी माझा मनाला ते पटत नव्हतं. सर्वत्रच पाणी भरल्यानं त्या मुक्या प्राण्याला कुठं निवारा नव्हता की पोटाला खायला काही मिळत नव्हतं. मग भुकेनं विव्हळत ते रडणार नाहीत तर काय?

५ दिवसांनी संपर्क

बुधवारी पाऊस न पडल्यानं सकाळी पाणी ओसरेल आणि कामाला जाता येईल, असा अनेकांनी विचार केला होता. पण हा अंदाजही पावसानं खोटा ठरवला. पाणी ओसरलं पण काही इंचामध्येच. तरीही दोन ते अडीच फूट पाणी होतंच. एव्हाना रेल्वे रुळांवरील काही पाणी ओसरलं होतं. गाड्या डुगूडुगू का होईना सुरु झाल्या होत्या. पण रेल्वे स्थानकापर्यंत जाण्याचा मार्ग पाण्यानं अडवून ठेवला होता. त्यामुळे जाणार कसं? ज्याप्रमाणे पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत गेली हाती, तशी पाण्याची पातळी कमी होत नव्हती.

संध्याकाळी पाण्याची पातळी थोडी कमी झाल्यानंतर एकेका इमारतीचा वीज पुरवठा पूर्ववत केला जायचा. तसा एकेका इमारतीत प्रकाश पडू लागला. माझ्याही इमारतीत आणि घरात ५ दिवसांनी वीज आली होती. वीज आल्यानंतर कोपऱ्यात फेकलेले मोबाईल बाहेर काढून चार्जिंगला लावले आणि आप्तस्वकीय आणि नातेवाईकांशी संपर्क साधत पुन्हा एकदात तुटलेला संपर्क जोडला गेला.

जोगवे फिरकलेच नाही...

एरवी आपल्याकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी घरोघरी फिरणारे जोगवे या कालावधीत कुठंच दिसले नाहीत. तळ मजल्यांवर राहणाऱ्या लोकांच्या घरादारांची आणि संसाराची राखरांगोळी तसेच दुकानदारांच्या सामानांची नासधूस होत असताना त्यांना साधा धीरही द्यायला कुणी बाहेर पडला नव्हता. सगळेच जोगवे आपापल्या घरात बसून राहिले होते. असे जोगवे मी मुंबईत कधीच पाहिले नव्हते. ज्यांच्या घरात पाणी शिरलं होतं, त्यांच्या मदतीला पुन्हा एकदा शेजारधर्मच धावून आला.

इमारतीतील दोन-चार कुटुंबांच्या घरात पाणी गेलं. पण या कुटुंबांना मायेचा आधार देत इमारतीतील सर्वच कुटुंबांनी गच्चीवर एकत्र भोजन करत त्यांना सोबत दिली. नव्हे तर त्यांना कुठंही एकटं पडू दिलं नाही. एकप्रकारचं स्पिरीट या माध्यमातून पहायला मिळालं. कोणताही राजकीय पक्ष हा आपल्यासाठी नसून संकटाच्यावेळी पहिला धावून येतो तो शेजारीच. शेजारधर्म हाच मोठा असतो हे या ५ दिवसांच्या अनुभवानं दाखवून दिलं.


हेही वाचा-

रेल्वेची चिंधीगिरी, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावरी


पुढील बातमी
इतर बातम्या