लसींसाठी बीएमसीच्या जागतिक निविदेला प्रतिसाद नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनावरील लसीचा तुटवडा भासत असल्याने मुंबई महापालिकेने लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढली होती. मात्र या निविदेला जागतिक कंपन्यांकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला आणखी एक आठवडा मुदतदेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणं आवश्यक आहे. मात्र, मुंबईत लसींअभावी लसीकरण संथगतीने होत आहे. तर काही केंद्रे बंद करावी लागली आहेत. मुंबईकरांना पुरेशी लस उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने एक कोटी लस मात्रा खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला.

पालिकेने जागतिक कंपन्यांकडून एक कोटी लस मात्रा खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ मे, तर त्यावरील अर्जदारांच्या शंका आणि सूचना १६ मेपर्यंत स्वीकारण्यात येणार होत्या. मात्र अद्याप जागतिक कंपन्यांकडून प्रतिसाद मिळू न शकल्याने आता पालिकेने अर्ज सादर करण्यासाठी एक आठवडय़ाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. लस खरेदीसाठी सादर होणारे अर्ज आता २५ मे रोजी विचारात घेण्यात येणार आहेत. 

मुंबईत सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा होत  आहे. जागतिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणखी चार लसींची भर पडेल. त्यात फायजर, जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुटनिक, मॉडर्ना अशा चार कंपन्यांचा समावेश असेल. 



हेही वाचा -

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबईतील लसीकरणाला पुन्हा होणार सुरूवात

इतर बातम्या