एन. एम. जोशी मार्गावरील पदपथ अडवून बसलेल्या शिवसैनिकाचं बांधकाम सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकानं जमीनदोस्त केलं. नायगाव येथील मंडईत पर्यायी गाळा उपलब्ध करून देऊनही या जागेचा मागील दहा वर्षांपासून वापर होत होता. याप्रकरणात न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर या बांधकामावर कारवाई करण्यात आली.
कॉम्रेड गणाचार्य चौकाकडून लोअर परेल स्टेशनकडे जाताना ना. म.जोशी मार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियम - सोनल पेट्रोलपंपाजवळ आणि अपोलो मिलच्या फाटकाजवळील पदपथावर गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून एक अनधिकृत बांधकाम झाले होते. शिवसेना शाखेशेजारी असलेल्या दुकानात एका शिवसैनिकाचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय होता, असं बोललं जात आहे. हे बांधकाम पदपथावर असल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा होत होता. अनेक वेळा पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागायचं. परिणामी रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा होण्यासोबतच पादचाऱ्यांना संभाव्य धोका असायचा.
या अनधिकृत बांधकामासंबंधी पात्र धारकाला वर्ष २००८ मध्येच नायगाव मंडई, दादर येथे पर्यायी जागा देण्यात आली होती. मात्र, संबंधितांद्वारे न्यायालयात दाद मागण्यात आली होती. याबाबत न्यायालयाने नुकताच महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार व महापालिकेचे परिमंडळ – २ चे उपायुक्त नरेंद्र रामकृष्ण बर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार हे अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्यात आले आहे.
३५ कर्मचारी, अधिकारी कारवाईत
महापालिकेच्या जी दक्षिण विभागाचे ३५ कर्मचारी, अधिकारी या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत सहभागी झाले होते. कारवाईसाठी १ जेसीबी, २ गॅस कटर, २ ट्रक यासह इतर आवश्यक वाहने आणि साधनसामुग्री वापरण्यात आली. संबंधीत अनधिकृत बांधकाम हटविण्यात आल्यानंतर पदपथावरील सदर ठिकाणी तात्काळ योग्य ते बांधकाम करण्यात येऊन पदपथ सलग करण्यात आला आहे, अशीही माहिती देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे
हेही वाचा -
राज्यभरात १ लिटरही दूध संकलित झालं नाही, राजू शेट्टींचा दावा
पश्चिम माटुंग्याच्या पादचारी पुलाला तडे गेल्याने बंद