वीज मीटरही होणार प्रीपेड, रिचार्ज न केल्यास वीजपुरवठा होणार बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मोबाईलप्रमाणेच आता प्रत्येकाच्या घरातील वीज मीटरही प्रीपेड होणार आहे. २०२२ पर्यंत वीज मीटर प्रीपेड करण्याचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२०-२१ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. वीजचोरी रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

अन्यथा वीजपुरवठा बंद

१ एप्रिलपासून घरामध्ये प्रीपेड वीज मीटर लावणं बंधनकारक केलं जाणार आहे. येत्या दोन वर्षात संपूर्ण देशभरात प्रीपेड वीज मीटर लावण्याचा सरकारचा मानस आहे. याकरता टप्प्याटप्प्यानं जुने मीटर हटवण्यात येतील. त्याचप्रमाणे वीज पुरवठाही स्मार्ट मीटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वीजेचा दर निवडण्याचा पर्यायही ग्राहकाला असणार आहे.

नुकसान भरपाई

यासाठी २२ हजार कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. प्रीपेड वीज मीटर आल्यास ग्राहकांना वीजेचं बील पाठवणं बंद होणार आहे. वीज कंपन्यांचं होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रीपेड वीज मीटर लावणं बंधनकार करण्यात येणार आहे. वीज बीलांवर होणारा खर्च कमी झाल्यामुळे याचा फायदा वीज वितरण कंपन्यांना होणार आहे.

मोबाईलद्वारे करा रिचार्ज

प्रीपेड मीटरचं उत्पादन वाढवण्याच्या सूचनाही यावेळी सीतारामन यांनी दिल्या आहेत. प्रीपेड वीज मीटर बाजारात उपलब्ध आहेत. साधारण ८ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत या प्रीपेड वीज मीटरची किंमत आहे. या प्रीपेड वीज मीटरचा रिचार्ज मोबाईलद्वारे करता येणार आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या