लोकलच्या दिव्यांगांच्या डब्यातून गरोदर महिलांना करता येणार प्रवास

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वे रुळांना तडा, सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तटणे यांसारख्या विविध कारणात्सव रेल्वेची वाहतूक नेहमीच विस्कळीत होते. त्यामुळं रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, धक्काबुक्कीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरं जावं लागतं. अशावेळी महिला प्रवासांची विशेषत: गरोदर महिला प्रवाशांची मोठी गैर सोय होते. त्यामुळं गरोदर महिला प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी, रेल्वेनं या प्रवाशांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. रेल्वेनं परवानगी दिल्यानं गरोदर महिलांना दिलासा मिळाला आहे.

समस्यांबद्दल चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी रेल्वेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी गरोदर महिलांना रेल्वेतून प्रवास करताना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. अमित ठाकरेंच्या या मागणीनंतर सोमवारी रेल्वे प्रशासनानं गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.

सीसीटीव्ही पुरेसे नाहीत

या बैठकीदरम्यान अमित ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. तसंच, रेल्वेत महिला प्रवासी सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरे म्हटलं होतं. प्रवासावेळी सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही पुरेसे नाहीत. तर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. दर रविवारी मेगाब्लॉक असतो. तरीही पावसाळ्यात वारंवार लोकलची रखडपड्डी होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.


हेही वाचा -

गोविंदा पथक आणि आयोजकांना परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीचा मुहुर्त ठरला


पुढील बातमी
इतर बातम्या