मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मुंबईतल्या पावसाची दखल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत बुधवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अ‍ॅलर्ट राजी करण्यात आला आहे. तसंच मुंबईत पुढील ४ दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसानं मुंबईला सकाळपासून झोडपून काढलं आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात येऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना अ‍ॅलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या.

मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी तुंबलं असून वाहतुकीची कोंडी झाली आहे. वरळी आणि प्रभादेवीतील रस्ते पाण्यात गेले आहेत. हिंदमाता इथं अडीच फुट पाणी साचलं आहे. तसंच, सायन आणि चुनाभट्टी इथं रेल्वेरुळावर पाणी भरल्यानं लोकल ठप्प झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीची पाहणी केली. महापालिकेने मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याचं कंट्रोल आपत्ती निवारण कक्षात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती निवारण कक्षात येऊन मुंबईतील विविध भागांची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादर टीटी किंवा हिंदमाता इथं पाहणी करण्यासाठी न येता ते थेट महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात आले. या कक्षातून त्यांनी अवघ्या ५ मिनिटात संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला.

मानखुर्दमधील नव्या उड्डाण पुलाखाली पाणी भरले होते. त्याची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी महानगरपालिकेच्या सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदले, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर हे उपस्थित होते.

बुधवारी ९ तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार होणार आहे, असं हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली सांगितलं.


हेही वाचा -

ब्लॅक फंगसच्या भितीपोटी नागरिकांची झाडांवर कुऱ्हाड, अफवा पसरवू नका

मास्कविना फिरणाऱ्या ३,४३४ जणांवर कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या