“पालघरमधील प्रदूषण महिन्याभरात कमी करा”

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रांतील प्रदूषण आणि अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगिरी करावी. येत्या महिन्याभरात प्रदूषण पातळीत कमालीची घट आणण्याकरीता प्रयत्न करावेत, असे निर्देश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

पालघर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  बोईसर, वसई, तारापूर या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रिया केंद्र या संदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, कामगार उपायुक्त, औद्योगिक सुरक्षा मंडळाचे अधिकारी, पालघरचे उपविभागीय अधिकारी डी.एस.नेरकर आदींसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी दादा भुसे म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रोजगाराला सरकारकडून प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबरोबरच निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणं आवश्यक आहे. यापूर्वी या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनांना जे विभाग जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. यासाठी गांभीर्याने काम करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

जे कारखाने प्रदूषण नियंत्रणाचे निकष पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करा. पुढील महिन्यापर्यंत या संदर्भात प्रभावी कारवाई करतानाच या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण कमी होण्याकरिता वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्याची सूचना देखील दादा भुसे यांनी यावेळी केली.


हेही वाचा -

मुंबईतील प्रदूषणात वाढ; हवेचा दर्जाही खालावला

प्रदूषण पसरवणारी एसएमएस कंपनी मुंबईबाहेर हलवण्याचा प्रस्ताव


पुढील बातमी
इतर बातम्या