गिरगावमध्ये खचला रस्ता, 'हा' मार्ग वाहतुकीसाठी बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील मेट्रो-३ प्रकल्पाजवळील रस्ता खचला आहे. मेट्रो रेल्वे स्थानकाचं काम सुरू असलेल्या या भागातील जगन्नाथ शंकरशेट मार्गावरील क्रांतिनगरसमोरचा रस्ता बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास खचला असून, मोठ्ठा खड्डा पडला आहे. रस्ता खचल्यामुळे गिरगाव चर्च ते ठाकूरद्वार दरम्यानचा जगन्नाथ शंकरशेट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी, बेस्टच्या बसगाडय़ा महर्षी कर्वे मार्गावरून धावू लागल्या. वाहतुकीसाठी रस्ता बंद केल्यामुळे गिरगाव परिसरात वास्तव्यास असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या बससाठी पायपीट करावी लागली.

खड्ड्याची माहिती मिळताच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. भुसभुशीत झालेल्या रस्त्याखाली १८ ते २० फूट खोल खड्डा पडल्याचे निदर्शनास आले. तसेच या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी होते. मेट्रो-३च्या स्थानकाचे काम सुरू होण्यापूर्वी रस्त्याखालून जाण्यारी जलवाहिनी पदपथावर स्थलांतरित करण्यात आली.

रस्त्याखाली पाणी साचून माती भुसभुशीत झाली असून त्यामुळे क्रांतिनगरसमोरचा रस्ता खचला. या रस्त्याची पाहणी करण्यात आली असून दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. काम सुरू असलेल्या परिसरातील जुन्या इमारतींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त दोन-तीन दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे एमएमआरसीएलकडून स्पष्ट करण्यात आले.

या मेट्रो रेल्वे स्थानकाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळ या परिसरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. तसेच या कामामुळे आसपासच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या