आरटीईची दुसरी सोडत, दुसऱ्या टप्प्यात 1664 जागा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई- बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील सोडत शिक्षण विभागाकडून पार पाडण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात 1664 जागा भरण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता 7449 पैकी 3660 जागा भरल्या गेल्या असून, अजूनही 3,789 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा एप्रिलपर्यंत भरावयाच्या आहेत. 

दरम्यान, शुक्रवारी पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील सोडतीत एसएससी बोर्डातील पहिलीच्या वर्गासाठीच्या 679 जागा तर पूर्व प्राथमिकसाठी 633 अशा एकूण 1312 जागा भरल्या गेल्या आहेत. तर इतर बोर्डाच्या पहिलीच्या वर्गासाठी 277 तर पूर्व प्राथमिकसाठी 72 अशा 349 जागा भरल्या गेल्या आहेत. 

शुक्रवारी पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील सोडतीतील अनेक गोंधळ शिक्षण विभागाकडून घालण्यात आल्याचा आरोप अनुदानित शिक्षा बचावचे सल्लागार सुधीर परांजपे यांनी केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रवेश दिला आहे, अशा काही विद्यार्थ्यांची नावे दुसऱ्या सोडतीतही घालत त्यांना प्रवेश देण्यात आला असून, ही चूक लक्षात आल्यानंतर या विद्यार्थ्यांना सॉरीचे मेसेज पाठवण्यात आल्याचेही परांजपे यांनी सांगितले आहे. यावरून आरटीई प्रवेशातील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरटीईच्या जागा 12 हजाराहून थेट साडे सात हजारांवर आणल्या आहेत. याबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. शाळांना सरकारकडून विद्यार्थ्यांचा खर्च मिळत नसल्याने या जागा कमी करण्यात आल्या आहेत. याचा फटका मात्र गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण 7449 जागांसाठी 9426 अर्ज सादर झाले आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांना काही ना काही कारणांनी गाळले जाणार असून, जागा कमी असल्याने काही विद्यार्थी आरटीईच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे आरटीईमधील त्रुटी दूर करत हा कायदा आणखी सक्षम करण्याचा पुनरूच्चार तज्ज्ञांनी केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या