मुंबईकरांच्या ताटातून म्हावरं गायब?

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • सिविक

रावस, बांगडा, पापलेट, बोंबिल, सुरमई अशा एकसे बढकर एक म्हावऱ्यावर ताव मारणाऱ्या मुंबईकरांच्या ताटातून म्हावरं गायब होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई-कोकण किनारपट्टी परिसरात केवळ १० ते १५ टक्केच मासे शिल्लक आहेत. त्यामुळे माशांचा तुडवडा निर्माण झाला असून माशांच्या किंमती दुप्पट-तिपटीनं वाढण्याची भीती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केली.

मासे घटण्याचं कारण काय?

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारांकडून पारंपारिक पद्धतीनं मासेमारी करण्यात येते. तर दुसरीकडे बेकायदेशीररित्या पद्धतीने 'पर्ससीन नेट' आणि 'बुलेट नेट'ने मासेमारी केली जाते. सद्यस्थितीत गोवा, गुजरात, केरळ आणि कर्नाटकातील खासगी कंत्राटदारांच्या बोटी मुंबई-कोकण किनारपट्टीवर येऊन पर्ससीन नेट-बुलेट नेटने बेकायदेशीररित्या मासेमारी करत आहेत.

या नेटने मासेमारी केल्यास एकाचवेळेला मोठ्या संख्येनं मासे जाळ्यात अडकतात. त्यात पूर्ण वाढ झालेल्या माशांसोबत लहान आकाराच्या माशांचाही समावेश असतो. माशांच्या प्रजनानावरही त्याचा परिणाम होत असल्याने या आधुनिक नेट माशांच्या प्रजातींना मारक ठरत आहेत.

पर्ससीन नेटला बंदी

फेब्रुवारी २०१६ मध्ये पर्ससीन मासेमारीला बंदी घालणारा कायदा लागू झाला. पण या कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यानं २०१६ पासूनही किनारपट्टीवर सातत्यानं पर्ससीन मासेमारी सुरूच आहे. त्यामुळे समुद्रातील माशांचं प्रमाण कमी होत असून सध्या किनारपट्टीवरील परिस्थिती बिकट झाली आहे. समुद्रात सध्या १० ते १५ टक्के इतकेच मासे शिल्लक असून येत्या १५-२० दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. मे अखेरीस मासेमारी पूर्णत: बंद झाल्यास म्हावरं मिळेनासे होतील, असं तांडेल यांनी म्हटलं आहे.

दरही वाढणार

माशांची टंचाई निर्माण झाल्यानं एकीकडे माशांच्या किंमती वाढणार असून दुसरीकडे लाखो मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येण्याचीही भीती व्यक्त होत आहे. सरकारकडून मात्र माशांच्या टंचाईचं वृत्त नाकारलं जातं असताना तांडेल यांनी सरकारच्या उदासीन धोरणामुळंच पर्ससीन मच्छिमारांचं फावतं असल्याचंही सांगितलं.

माशांच्या टंचाईवर आणि पर्ससीन मासेमारीविषयावर चर्चा करण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची भेट घेणार असल्याचंही तांडेल यांनी सांगितलं.


हेही वाचा-

मुंबई किनारपट्टीवर 'चोरी चोरी चुपके चुपके' पर्ससीन मासेमारी?

पर्ससीन नेट मासेमारीवर अखेर केंद्र सरकारची बंदी


पुढील बातमी
इतर बातम्या