ओह नो... महापालिकेतील कामगारांची भरती लांबली

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील कामगारांच्या १३८८ जागांसाठी करण्यात येणाऱ्या भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीने राखून ठेवला आहे. त्यामुळे या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. या भरतीबाबत सदस्यांनी शंका उपस्थित केल्याने या शंकांचं निरसन पुढील बैठकीत करण्याचे निर्देश देत स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हा प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी या भरतीला मान्यता मिळाली असती, तर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला त्वरीत सुरुवात होणार होती. परंतु हा प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवल्यामुळे कामगारांची भरती आता आणखी ८ ते १० दिवस लांबली आहे.

प्रस्ताव का राखून ठेवला?

मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा, मलनि:स्सारण विभाग, आरोग्य विभागांमधील कामगारांची १३८८ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनुसार प्रक्रिया राबवण्यासाठी खासगी संस्थेची निवड करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे बुधवारी मंजुरीला आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी या भरतीबाबत शंका उपस्थित केली. महापालिकेच्या १३८८ कामगारांच्या रिक्त जागा भरण्यासाठी २००९ च्या प्रतिक्षा यादीवरील उत्तीर्ण उमेद्वारांना या भरतीत प्राधान्याने सामावून घेण्याची मागणी जाधव यांनी केली. प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांचा विचार न करता त्यांना वेठीस धरूत ही भरती केली जात असल्याने हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी जाधव यांनी केली.

प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांचं काय?

शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनीही २००९ च्या कामगार भरतीत ज्या उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले, अशा प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांबाबत काय भूमिका आहे हेही स्प्ष्ट करावं? असं सांगितलं. या सर्व ९०० उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उद्या या याचिकेवर वेगळा निकाल लागला, तर काय करणार? असा सवाल त्यांनी केला. महापालिकेत प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी भरतीत १० टक्के जागा राखीव असायची. परंतु त्याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही, असं सांगत या भरतीत पारदर्शकता असावी, अशी सूचना केली.

रिक्त जागाही भरा

हा प्रस्ताव मंजूर करण्याची गरज असल्याचं सांगत शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी न्यायालयात गेलेल्या ९३० उमेदवारांमुळे या भरतीत आडकाठी येणार नाही ना हे समोर आणतानाच, या कामगारांबरोबर शिक्षण विभागातील रिक्त जागाही भरण्याची मागणी केली.

ही भरती प्रक्रिया कायदेशीर अडचणी अडकणार नाही याचीही माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे संजय घाडी यांनी केली. त्यामुळे अखेर प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांबाबत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करत सर्व माहिती समितीपुढे ठेवावी, असे आदेश देत हा प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवला.


हेही वाचा-

अशी असेल मुंबई पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया


पुढील बातमी
इतर बातम्या