प्लॅस्टिक किंवा सिंथेटिक मटेरिअलने चायनीज मांजा (chinese manja) बनवला जातो. तसेच चायनीज स्ट्रिंग किंवा नायलॉन (nylon) किंवा प्लॅस्टिकचा कृत्रिम मांजा पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा कृत्रिम मांजा माणसांबरोबरच पक्ष्यांनाही धोकादायक आहे.
त्यामुळे ठाणे (thane) महापालिका क्षेत्रात (thane municipal corporation) याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील संबंधित तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण 255 ठिकाणी तपासणी करण्यात आली.
यात पालिकेला चिनी मांजा सापडला नाही. मात्र, या तपासणीदरम्यान जवळपास 214 किलो सिंगल यूज प्लास्टिक (single use plastic) जप्त करण्यात आले. याचा पालिकेकडून 89 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
चायनीज मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारीक काच, धातू किंवा इतर तीक्ष्ण सामग्री वापरली जाते. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापरावर निर्बंध घातले आहेत.
हा धागा जैविक दृष्ट्या विघटित होत नसल्याने याचा ड्रेनेजवर परिणाम होतो. तसेच जनावरांचेही नुकसान होत आहे. तसेच हा धागा विद्युत वाहक असल्याने विद्युत उपकरणे व वीज उपकेंद्रावर भार पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, चायनीज मांजा आणि सिंथेटिक-नायलॉन मांजा यांची विक्री, निर्मिती, साठवणूक आणि वापर रोखण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर नियमितपणे तपासणी आणि जप्तीची मोहीम राबविण्यात येत आहे.
यासाठी सहायक आयुक्त स्तरावर प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कर निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे.
तसेच स्थानिक पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेत आतापर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण 255 ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. यात त्यांना चिनी मांजा सापडला नाही.
बंदी घातलेल्या सिंथेटिक, नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवणूक, पुरवठा किंवा वापर याबाबतच्या तक्रारी नोंदवण्यासाठी नागरिकांना 8657887101 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच pcctmc.ho@gmail.com वर तक्रार नोंदवता येईल.
हेही वाचा