वरळीत कोरोनासूर आणि हिंगणघाट आरोपीच्या प्रतिकृतीचं दहन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वरळी बीडीडी चाळीत उत्साहात होळी साजरी करण्यात आली. बीडीडी चाळीतील होळीका दहन हे दरवर्षी खास असतं. याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या विषयांना घेऊन इथं प्रतिकृती साकारल्या जातात आणि त्यांचं दहन केलं जातं. एकप्रकारे या होलिका दहनमधून एक संदेश दिला जातो.  

साऱ्या वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा या अपेक्षेनं होळी पेटवली जाते. त्यानुसार सध्या जगभर धुमाकूळ घालणारा जीवघेणा कोरोना व्हायरस जगातून निघून जावा यासाठी मुंबईच्या वरळी भागातील बीडीडी चाळीत 'कोरोनासूर' जाळला गेला. 'कोरोना' हे व्हायरसचे (Coronavirus) नाव 'असूर' म्हणजे राक्षस आहे. त्यामुळे आज होलिकादहनाला त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेला

बीडीडी चाळ ७८ आणि ७९ इथल्या वीर नेताजी क्रिडा मंडळानं भल्लामोठा कोरोनासूर साकारला आहे. फक्त कोरोनासूर राक्षस साकारला नाही तर त्यांनी कोरोनाची जनजागृती करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. दोन आठवडे आधीपासून याची तयारी केली जाते. टाकाऊ वस्तूंचा वापर करून हा पुतळा साकारण्यात आला आहे

२०१८ साली बीडीडी चाळ रहिवाशांनी पीएनबी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेला व्यापारी नीरव मोदी याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. यंदा होळी सणावर कोरोना व्हायरसचं सावट असल्याने आता त्याचा नाश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तर बीडीडी चाळ नंबर ७६ आणि ७७ इथं हिंगणघाटच्या आरोपीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. याचं देखील दहन करण्यात आलं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत हिंगणघाट आरोपीची प्रतिकृती साकारली आहे. श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे


पुढील बातमी
इतर बातम्या