मुंबईची हिरकणी...स्टेफी केणी!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - आपल्या बाळाला पाठिशी बांधून उभा दगडी कडा चढणाऱ्या हिरकणीची कहाणी तुम्हाला माहीत असेलच. अशीच एक हिरकणी मुंबईत आहे. मात्र ती कोणताही कडा चढत नसून जनसेवेसाठी आपल्या तीन महिन्यांच्या मुलाला घेऊन थेट महापालिकेत हजेरी लावत आहे. त्या आहेत काँग्रेसच्या स्टेफी केणी.

महापालिका निवडणूक जिंकून नगरसेवक झालेले महापालिका सदस्य जिथे सभागृहाला दांडी मारतात, तिथे नवनिर्वाचित नगरसेवक सभागृहाला विशेष महत्व देताना दिसत आहेत. काँग्रेसच्या मालाड मार्वेमधील नवनिर्वाचित नगरसेविका स्टेफी केणी यातर चक्क तीन महिन्याच्या बाळाला घेऊनच महापालिका सभागृहाला हजेरी लावत आहेत. त्यामुळे एका बाजूला मातृत्व आणि दुसरी लोकप्रतिनिधी अशी तारेवरची कसरत करत महापालिका सभागृह आणि विभागातील कामकाजात बाळाला सोबत घेऊनच स्टेफी केणी यांना जबाबदारी पार पाडावी लागत आहे. विशेष म्हणजे पतीने, चक्क नोकरी सोडून नगरसेवक पत्नीला साथ देत बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी सांभाळली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मालाड मार्वेमधून काँग्रेसच्या उमेदवार स्टेफी केणी या विजयी झाल्या आहेत. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापालिकेचे तिसरे सभागृह पार पडले. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसह या तिसऱ्या सभागृहाला काँग्रेसच्या नगरसेविका स्टेफी केणी या तीन महिन्याच्या बाळाला घेऊन महापलिकेत येत आहेत. मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देऊन कामकाजाकरता त्या सभागृहात निघून जातात. त्यामुळे महापालिका सभागृहाच्या आवारातील या छोट्या बाळाची हजेरी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.


तीन महिन्याच्या या बाळाचे नाव सॅन्चेस असे आहे. स्टेफी केणी यांचे पती मार्यू ग्रेसेस हे महापालिकेत मुलाला खेळवत आपल्या पत्नीला सहकार्य करत असतात. मढ मार्वे येथून लांब पल्ल्याच्या प्रवास करत महापालिका मुख्यालयालयात यायला दोन ते अडीच तासाचा वेळ लागतो. तर संध्याकाळी घरी जायला तीनपेक्षाही अधिक तास लागतात. त्यामुळे कधी आई तर कधी मी, स्टेफी सभागृहात गेल्यानंतर बाळाला सांभाळत असतो. नगरसेवक म्हणून स्टेफी निवडून आल्यानंतर तिला पाठिंबा देण्यासाठी आणि बाळाला अधिक वेळ देता यावा, म्हणून मला नोकरी सोडावी लागली आहे. परंतु बाळ मोठं झाल्यास आपण पुन्हा नोकरी करू, असे त्याने सांगितले.

महापालिका सभांना उपस्थित राहण्यासाठी बाळ लहान असल्यामुळे बाळाला सोबत आणण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे कधी आई, तर कधी सासू, तर कधी नवरा आपल्यासोबत येवून बाळाचा सांभाळ करत असतात. परंतु सभागृहच उशिरा सुरू होत असल्यामुळे आपली प्रचंड अडचण होत असते. सभागृहातील कामकाज समजून घेणे आवश्यक आहे. त्यातच मुलाला घेऊन बसवण्यासाठी महिलांसाठी माता आणि बाल कक्ष तयार करण्यात यावा, अशी मागणी आपण करणार असल्याचे स्टेफी केणी यांनी सांगितले. पक्षाचे कार्यालय असले तरी त्यामध्ये महिलांसाठी व्यवस्था नसल्यामुळे महापालिकेत स्वतंत्र कक्षाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या