मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर झाडाची फांदी कोसळली, एकाचा मृत्यू

मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू, तर दोघेजण जखमी झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी दुपारी घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या झाडाची फांदी तोडण्यासाठी परिसरातील रहिवाशांनी महापालिकेला अनेकदा निवेदन देऊनही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. मृत व्यक्तीचं नाव रवी शहा (३१) असं असून उर्वी शहा (२७) ही महिला जखमी आहे. तर रिक्षा चालक चंद्रभान गुप्ता (४०) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

कधी झाली दुर्घटना?

मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड काॅलनी परिसरातील गुरू गाेविंद सिंग मार्गावरून दुपारी २.१८ वाजेच्या सुमारास एक रिक्षा प्रवाशांना घेऊन जात होती. याच वेळेस महाराष्ट्र बँकेजवळील एका झाडाची फांदी अचानक चालत्या रिक्षावर कोसळली. या दुर्घटनेत रिक्षा चालक आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.

उपचार सुरू

ही घटना घडताच परिसरातील स्थानिकांनी त्वरीत महापालिका आणि पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. जखमींना रुग्णवाहिकेतून त्वरीत नजीकच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. 

इतर बातम्या