एपीएमसी मार्केट बुधवारपासून पुन्हा सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वाशी येथील एपीएमसी मार्केट आता बुधवार दि.१५ एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागातील भाजीपाला, कांदा-बटाटा तसंच धान्य पुरवठा सुरळीत राहावा म्हणून एपीएमसी मार्केट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मसाले आणि फळ बाजाराबाबत मात्र अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. 

एपीएमसी मार्केटमधील मसाला मार्केटच्या एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला घेतला होता. माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या मागणी नंतर भाजी, फळ, कांदा बटाटा मार्केट शनिवार 11 एप्रिलपासून बंद करण्यात आले होते. मात्र, आता एपीएमसी व्यवस्थापनाने माथाडी कामगार, व्यापारी तसंच वाहतूकदारांच्या प्रतिनिधींशी केलेली चर्चा यशस्वी ठरली आहे. कांदा-बटाटा तसंच भाजी मार्केटमधील सर्व व्यवहार १५ एप्रिलपासून पूर्ववत करण्यास सर्वांनीच तयारी दर्शविली आहे.

एपीएमसी बंद झाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागातील भाजीपाला आणि कांदा- बटाटा याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थापनाकडून सातत्याने सर्व संबंधितांशी चर्चा सुरू होती. ही चर्चा यशस्वी ठरली आहे. पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून भाजीपाला मार्केट पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितलं.


हेही वाचा -

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - नरेंद्र मोदी

मार्च, एप्रिलचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ

प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माची अंधश्रद्धेतूनच आत्महत्या, मिञाविरोधात गुन्हा दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या