महाराष्ट्राने आजवर अनेक संप पाहिले आहेत. मग तो गिरणी कामगारांचा संप असो वा इतर कोणताही. मात्र सध्या महाराष्ट्रात लाखांच्या पोशिंद्याने संप पुकारला आहे.
शेतकरी कधी संपावर जाईल असे, भाजपा सरकारला स्वप्नात देखील वाटले नसेल. आजपर्यंत इंग्रजांच्या 150 वर्षाच्या कालखंडात, काँग्रेसच्या कालखंडात कधीही असा संप झाला नव्हता. परंतु महागाई वाढली असूनही पिकवलेल्या भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातला बळीराजा संपावर गेला आहे.
1 जूनला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनी संप पुकारल्यानंतर संपाचा कुठेही जलद परिणाम दिसून आला नसला तरी, 2 जूनला मात्र मुंबईभरातील अनेक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले पहायला मिळाले. अनेक ठिकाणी दुधाचा तुटवडा असल्याचे जाणवले. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईत दररोज प्रचंड गर्दी पहायला मिळते. परंतु, शुक्रवारी तुलनेने गर्दी कमी होती. अल्प प्रमाणात लोकांनी भाजी खरेदी केली. बाजारपेठेत भाज्यांची आवक न झाल्यामुळे अनेक भाजी विक्रेते आपला धंदा बंद करून बसलेले पहायला मिळाले.
शेतकरी कधी संपावर जाईल याची सरकारप्रमाणे ज्या विक्रेत्यांनाही खात्री नव्हती अशा भाजी विक्रेत्यांची विशेष तारांबळ उडाली. पूर्व नियोजन नसल्यामुळे अनेकांनी आपले धंदे बंद ठेवले होते. ज्यांच्याकडे अधिक प्रमाणात भाज्या होत्या त्यांनी त्या दुप्पट भावाने विक्रीसाठी ठेवल्या होत्या. ज्या कोथिंबीरीच्या जुडीची साधारण किंमत 40 रुपये असते ती कोथिंबीरीची जुडी तब्बल 150 रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. 20 रुपये किलो टोमॅटो 50-60 रुपये किमतीने विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
पालेभाज्यांमध्ये पालक वगळता विशेष कोणत्याच भाज्या दिसत नव्हत्या. गवार, भेंडी अशा फळभाज्यांची देखील आवक न झाल्यामुळे नेहमी गजबजलेल्या दादरच्या भाजी मंडईत शुक्रवारी विशेष गर्दी पहायला मिळाली नाही. भाज्या मंडईमध्ये नाहीत म्हणून रोष व्यक्त न करता बळीराजाच्या या संपाला मुंबईतल्या ग्राहक वर्गाने मात्र पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे.
आज मार्केटमध्ये थोडा माल आला आहे. माल कमी असल्यामुळे दर वाढवले आहेत. मी दररोज मिरची आणि कोथिंबीर विक्री करतो. आवक नसल्यामुळे आज 40 रुपयांची जुडी 150 रुपयांना असल्यामुळे मी आज विक्रीसाठी ठेवलेली नाही. माल नसल्यामुळे विक्री बरोबरच खरेदीवर सुद्धा परिणाम झाला आहे.
- मल्लिकअर्जून कदम, मिरची कोथिंबीर विक्रेते, सावरकर भाजी मंडई, दादर
दोन दिवस विक्री करुन राहिलेला माल आज विक्रीसाठी ठेवला आहे. तो आज विकत आहोत खरा फरक उद्या कळेल. शेतकऱ्यांच्या मागण्या आज मान्य व्हाव्यात. सरकारने लक्ष घालावे शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे.- विठ्ठल वाल्हेकर, लिंबू विक्रेते, सावरकर भाजी मंडई दादर
शेतकरी संपामुळे भाजीमार्केटवर कोणताही परिणाम झालेला नाही. जर कुठे भाज्यांचे दर वाढले असतील किंवा अशा अफवा पसरल्या असतील तर, 18002330244 या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आज घाऊक बाजारात स्टॉक असल्यामुळे किमान 60 टक्के भाजी मिळू शकली. मात्र शेतकऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर आम्हा भाजीविक्रेत्यावर देखील उपासमारीची वेळ येईल.
- संदिप गुप्ता, भाजी विक्रेता
संपाचा परिणाम दूध उत्पादनांवर देखील झाल्याने शुक्रवारी रोजच्या तुलनेत अल्प प्रमाणात सेंटरवर दूध उपलब्ध झाले. मात्र दुधाच्या पिशवीवर प्रिंट केलेल्या शुल्कानेच दुधाची विक्री करण्यात आली.- रघुवीर चौटेला, दूध विक्रेता
सायन कोळीवाडा येथील पंजाबी कॅम्प येथे गुरुवारी झालेल्या लाठीचार्ज प्रकरणामुळे स्थानिक संतप्त झाले. संतप्त नागरिकांनी याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती.
राज्यभरात शेतकऱ्यांच्या चाललेल्या संपामुळे आधीच भाजी मंडई मंदावली असून, त्यातच निषेधार्थ म्हणून बंद ठेवल्या गेलेल्या या भाजी मंडईची नुकसान भरपाई येथील विक्रेत्यांना करावी लागणार आहे.
परिसरात झालेल्या संपूर्ण घटनेचा निषेध करत येथील मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. लोकांची गैरसोय होईल परंतु या घटनेचा निषेध हा स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात आहे.
- इंदरपाल सिंग, महाराष्ट्र सचिव, शिवसेना अवजड वाहतूक सेना
कॉ. गणपत पाटील मंडई, शिवडी येथील शुक्रवारचे भाज्यांचे दर
भाज्या/ फळभाज्या | दर (प्र. किलो) |
---|---|
कांदा | 12 रु. |
बटाटा | 20 रु. |
लसूण | 100 रु. |
टोमॉटो | 40 रु. |
कोथिंबीर | 100 रु. जुडी |
भेंडी | 80 रु. |
कोबी | 50 रु. |
पाले भाज्या | किरकोळ बाजार भाव |
---|---|
मेथी | 50 रु. जुडी |
कांद्याची पात | 60 रु. जुडी |
पालक | 20 रु. जुडी |
हिरवा माठ | 10 रु. जुडी |
लाल माठ | 10 रु. जुडी |
हिरवी चवळी | 10 रु. जुडी |
वाशी फळ बाजारात दाखल झालेली वाहने (शुक्रवार)
ट्रक | 55 |
टेम्पो | 173 |
एकूण | 228 |
वाशी, एपीएमसीत दाखल झालेली वाहने
कांदा | 0 |
बटाटा
ट्रक | 59 |
टेम्पो | 03 |
एकूण | 62 |
लसूण
ट्रक | 9 |
टेम्पो | 01 |
एकूण | 10 |