वडाळा गाव संपूर्ण सील, 24 नवे रुग्ण आढळले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वडाळा गावातील कार्तिक नगरमध्ये मागील 5 दिवसांत 24 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हा परिसर पूर्ण सील करून मुंबई महानगरपालिकेने कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. एफ-उत्तर प्रभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेलाले यांनी या परिसरात 8 मे ते 17 मे या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे.

वडाळा गावाची जवळपास 15,000 लोकसंख्या आहे. या भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका वरळी-कोळीवाड्यात वापरलेले कंटेन्टमेंट झोन माॅडेल येथेही वापरणार आहेत. 29 मार्च ते 7 मे या कालावधीत वरळी कोळीवाडा संपूर्ण सील केला होता. सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवल्या जात होत्या.

पालिकेच्या योजनेनुसार, वडाळा गावात अधिक जोखमीचे आणि कमी जोखमीचे असे रुग्णांचे वर्गीकरण करणार आहे. अधिक जोखमीच्या रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवलं जाईल. तर कमी जोखमीच्या रुग्णांना वडाळा गावात राहण्याची मुभा दिली जाईल. शुक्रवारी वडाळा गावात प्रवेश करणारे भैरवनाथ रोड, शिवडी वडाळा क्रॉस रोड, गणेश मंदिर रोड आणि जैन देरासर रोड असे चारही प्रवेशद्वार पोलिसांनी संपूर्ण बंद केले  असल्याची माहिती स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी दिली. 

एफ-उत्तर सहाय्यक आयुक्त बेलाले यांनी सांगितले की, रहिवाशांना आधीच राशन पुरवण्यात आलं आहे. ते भाजी विकत घेऊ शकतात. पण उद्यापासून त्यांना दूध व किराणा सामान मिळेल.


हेही वाचा  -

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा


पुढील बातमी
इतर बातम्या