वापरातील कपडे जुने झाल्यावर अनेकदा नागरिक ते कचऱ्यात फेकून देतात. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे एकाच प्रकारचे कपडे (textiles) वापरण्याचा कालावधी कमी झाला असून जुने कपडे टाकून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या अखत्यारितील वस्त्र समितीच्या वतीने पुढाकार घेतला असून टाकाऊ वस्त्रावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प नवी मुंबईत राबविण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात 250 गृहसंकुलात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पामुळे महिलांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत टेक्सटाईल कमिटी आणि नवी मुंबई महापालिकेच्या (nmmc) माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये एसबीआय फाऊंडेशन लि.,आयडीएच इंडिया हब प्रा.लि., टिसर आर्टिसन ट्रस्ट या संस्थांचा सहयोग असणार आहे.
या पाच संस्थांमध्ये या बाबतचा सामंजस्य करार करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत (project) टाकाऊ कपड्यांचे संकलन करण्यासाठी पहिल्या टप्प्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 250 गृहसंकुलांमध्ये पेट्या ठेवण्यात येणार आहेत.
एसबीआय फाउंडेशन लि. यांच्या मदतीने व टिसर आर्टिसन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेमार्फत एकूण 47 गृहसंकुलांमध्ये स्वतंत्र 49 पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित पेट्या टप्प्याटप्प्याने इतर सोसायट्यांमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
टाकाऊ वस्त्राचे संकलन करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. बेलापूर (belapur) येथील शकुंतला महाजन बहुउद्देशीय इमारत येथे संकलित कपड्यावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे.
तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे बाजारपेठेत प्रदर्शन करण्यात येणार असून त्यांची विक्रीही करण्यात येणार आहे. यामध्ये महिला स्वयंसहाय्यता बचतगटांची मदत घेतली जाणार आहे.