बाबुलनाथ मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय, आता केवळ..

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला हानी पोहोचली आहे. मंदिराच्या विश्वस्त समितीनं पिंडीचं नुकसान टाळण्यासाठी आयआयटी मुंबईकडून सर्व्हेक्षण करून घेतलं. मंदिराच्या विश्वस्तांना आयआयटी मुंबईच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

या अहवालातून दिल्या जाणाऱ्या शिफारशी, सूचनांबद्दल विश्वस्तांकडून निर्णय घेतला जाईल. विश्वस्तांकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन भाविकांना करण्यात आलं आहे. मंदिरात सध्या दुग्धाभिषेकास परवानगी नाही.

कोरोना संकट काळापासूनच मंदिरात दुग्धाभिषेक बंद असल्याचं बाबुलनाथ मंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीन ठक्कर यांनी सांगितलं. केमिकलयुक्त पदार्थ वाहिल्यानं पिंडीला धोका पोहोचल्याचं मंदिरातील पुजाऱ्यांच्या लक्षात आलं. जवळपास ८ ते १० महिने पुजाऱ्यांनी या गोष्टीचं निरीक्षण केलं.

शिवपिंडीला धोका पोहोचत असल्याची शंका पुजाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी मुंबई आयआयटीकडून सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई आयआयटीचं पथक पिंडीच्या संरक्षणासाठी शिफारशी सुचवणार आहे. याच महिन्यात त्यांचा अहवाल प्राप्त होऊ शकतो.

'बाबुलनाथ मंदिर मुंबईकरांच्या आस्थेचा विषय आहे. शंकरांच्या पिंडीबद्दल आम्ही अतिशय संवेदनशील आहोत. तिच्या संरक्षणासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि आवश्यक पावलं उचलू,' असं विश्वस्तांकडून सांगण्यात आलं.

मंदिराशी संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, शंकराच्या पिंडीवर दूध, पाणी, मध, अबीर, गुलाल, चंदन, भस्म, बेलपत्र, कणेरीची फुलं, धोतऱ्याचं फळ वाहिलं जातं. बाजारात उपलब्ध असलेल्या अबीर, चंदन, भस्म यांच्यामध्ये भेसळ केली जाते. त्यात केमिकल मिसळलेलं असतं. दूधात कॅल्शियम असतं. त्यामुळे पिंडीचं नुकसान होण्याचा धोका असतो.

बाबुलनाथ मुंबईतील सर्वात प्राचीन शिवमंदिर आहे. इथली शंकराची पिंडी ३५० वर्षे जुनी आहे. या पिंडीचं नुकसान टाळण्यासाठी मुंबई आयआयटीचे तज्ज्ञ अहवाल तयार करत आहेत. शंकराच्या पिंडीचं नुकसान होत असल्याचं दिसून आल्यानं मंदिराच्या विश्वस्त समितीनं दूध, राख, गुलाल आणि विविध प्रकारचा प्रसाद अर्पण करण्यास मज्जाव केला आहे. या ठिकाणी केवळ जलाभिषेक करता येईल.


हेही वाचा

बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला तडे गेल्याचा दावा, प्रशासनाची IITमुंबईकडे धाव

पुढील बातमी
इतर बातम्या