Exclusive: भायखळ्यातील 'त्या' कैद्यांना अन्नबाधा की औषधबाधा?

भायखळा कारागृहातील ८७ महिला कैद्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्यानं शुक्रवारी सकाळी जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिला कैद्यांना अन्नातून वा पाण्यातून विषबाधा झाल्याचा कारागृह प्रशासनासह जे. जे. रूग्णातील डाॅक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. 

असं असताना आता मात्र एक नवीन धक्कादायक बाब अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या चौकशीतून समोर आली आहे. ती म्हणजे या कैद्यांना गुरूवारी रात्री लेप्टोस्पायरीससाठीची प्रतिबंधात्मक औषधं दिली होती. त्यामुळं ही औषधं बाधल्याचा संशय व्यक्त करत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी भायखळा कारागृहातून डाॅक्सी स्लाईकीन औषधांचे नमुने घेत ते तापासणीसाठी पाठवले आहेत. यामुळं आता या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

लेप्टो प्रतिबंधात्मक औषधं दिली

एफडीएतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा कारागृहातील ५ पुरूष कैद्यांना १५ जुलैला काॅलरा झाला. त्यानंतर कारागृहातील डाॅक्टरांनी ३९९ पुरूष आणि ३१२ महिला कैद्यांची आरोग्य तपासणी करत त्यांना दक्षता म्हणून डाॅक्सी स्लाईकीन १०० mg ही लेप्टो प्रतिबंधात्मक कैद्यांना दिली. गुरूवारी रात्रीच्या जेवणानंतर ही औषध घेतलेल्यांपैकी २५ महिलांना रात्रीच उलटीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्वरीत या महिला कैद्यांवर उपचार करण्यात आले.

एफडीए पथकाची धाव  

पण शुक्रवारी सकाळच्या नाश्त्यानंतर महिला कैद्यांना उलटी, जुलाब आणि मळमळ यासारखा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्वरीत महिला कैद्यांना जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं.  या महिलांवर उपचार सुरू असून काही महिलांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, या महिलांना अन्नबाधा झाल्याचं कारागृह प्रशासन आणि डाॅक्टरांकडून सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षात एफडीएच्या अन्न विभागानं शुक्रवारी या ठिकाणी धाव घेत तपासणी केली असता कैद्यांना प्रतिबंधात्मक औषध दिल्याचंही समोर आलं. त्यामुळं लगेचच एफडीएच्या औषध विभागाच्या पथकांनं धाव घेतली.

औषधांचे नमुने ताब्यात 

रूग्णालयात दाखल झालेल्या महिला कैद्यांना प्रतिबंधात्मक औषधांमुळं त्रास झाल्याची शक्यता व्यक्त करत डाॅक्सी स्लाईकीन या औषधांचे चार नमुने ताब्यात घेतल्याची माहिती डी. आर. गहाणे, सहआयुक्त, औषध (बृहन्मुंबई), एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. त्यानुसार एक नमुना तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात आला असून यावरील अहवाल आल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलं आहे. ज्या डाॅक्सी स्लाईकीन औषधांचे नमुने ताब्यात घेतले आहेत त्या औषधांचा बॅच नंबर २७२३ असा अाहे. ही औषधं ओरिसा ड्रग्ज अॅण्ड केमिकल्स लिमिटेड या कंपनीची असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  

अन्नपदार्थांचे नमुने तपासणीला 

दुसरीकडं एफडीएच्या अन्न विभागानं पोहे, तांदुळ, गहू, अख्खे मसुर आणि खाद्यतेल असे पाच अन्नपदार्थांचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त, अन्न (बृहन्मुंबई), एफडीए यांनी दिली आहे. तर आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने घेत हे नमुनेही तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यामुळं नेमकी ही विषबाधा अन्नामुळं, पाण्यामुळं कि प्रतिबंधात्मक औषधांमुळं झालं हे आता अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पण या प्रकऱणावरून एक गोष्ट समोर आली की, कैद्यांच्या आरोग्याकडं कारागृह प्रशासनानं अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

महिला अायोगाची कारागृहाला नोटीस

राज्य महिला अायोगाच्या सदस्यांनी शनिवारी भायखळा कारागृहाला भेट देत सुविधांची पाहणी केली. यावेळी कारागृहात सुविधांचा बोजवारा उडाल्याचं दिसून अालं. त्यामुळे अाता लवकरच कारागृह प्रशासनाला नोटीस बजावत अावश्यक ते सुविधा देण्याचे अादेश देण्यात येणार असल्याचं सदस्य अॅड. अाशा लांडगे यांनी सांगितलं. तर १५ दिवसात बदल झाले नाही तर पुढील कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.


हेही वाचा -

२२ दिवसांच्या बाळाच्या शरीरात सुई, वाडियामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया


 

पुढील बातमी
इतर बातम्या