ICSE दहावीची परीक्षा रद्द करा, युवासेनेचं बोर्डाला पत्र

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदे (CISCE)द्वारे आयोजित करण्यात येणारी दहावीची परीक्षा (ICSE) रद्द करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेने पत्र लिहून केली आहे. ३ जूनपासून प्रलंबित असलेली ही परीक्षा २ जुलै ते १२ जुलै २०२० दरम्यान घेण्याचं ठरलं आहे.

या आधी कुठल्या विषया संबंधित परीक्षा घेण्यात आल्या असतील, चाचणी परीक्षा झाल्या असतील तर त्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देता येऊ शकतील किंवा शाळेकडे मूल्यांकनाचा इतर कुठला फाॅर्म्युला असेल, तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावं, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. 

हेही वाचा - एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनो घाबरू नका, तुमच्यासाठीही लवकरच योग्य निर्णय- उदय सामंत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे आयसीएसई बोर्डाच्या १० वी इयत्तेच्या परीक्षांचं वेळापत्रक नव्याने ठरवून २ जुलै ते १२ जुलै दरम्यान या परीक्षा घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. तर आयएससी बोर्डाच्या १२ वी इयत्तेच्या परीक्षा १ जुलै ते १४ जुलै २०२० दरम्यान घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत, फेस मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापर करून सुरक्षित पद्धतीने परीक्षा घेण्यात येतील, असं सीआयएससीई मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव गॅरी आर्थन यांनी स्पष्ट केलं. 

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात विद्यार्थी आणि शाळेतील इतर कर्मचारी वर्ग यांच्या आरोग्य तसंच सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे. त्यामुळे आयसीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती युवा सेनेचे वरून देसाई यांनी गॅरी आर्थन यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात केली आहे.

या पत्रावर भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद पुनर्विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेते की ठरवलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेते, हे लवकरच कळेल, अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालक व्यक्त करत आहेत. 

हेही वाचा - यंदा १२ वीचा निकाल १० जूनला नाही लागणार, विद्यार्थ्यांना पहावी लागणार वाट

पुढील बातमी
इतर बातम्या