राेहीतकडे वन डे चं कर्णधारपद?

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडियात अनेक महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. ‘भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डा’(BCCI)च्या  आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वन-डे आणि टी-२० संघाचं नेतृत्व कर्णधार विराट कोहली ऐवजी रोहित शर्माकडे तर, विराटकडे फक्त कसोटी संघाचं नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच विराट आणि रोहित यांच्यात कुठलाही वाद नसल्याचंही या आधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. 

'यांना' विश्रांती

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे (COA) प्रमुख विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच प्रशासकिय समितीची बैठक झाली. या बैठकीत ३ सदस्यीय समिती आणि सीईओ राहुल जोहरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. यात त्यांनी खेळाडूंनी कुठल्या स्पर्धेत सहभागी व्हायचं आणि कुठल्या स्पर्धेतून विश्रांती घ्यायची, हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानुसार आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात विराट आणि बुमराह यांना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

कामगिरीची समिक्षा 

सोबतच वर्ल्डकपमधील कामगिरीवर होणाऱ्या समिक्षा बैठकीला कर्णधार विराट कोहली, कोच रवी शास्त्री आणि निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसादही उपस्थित राहणार आहे. ‘भूतकाळात काय झालं, त्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. भारतीय संघाच्या पुढील तयारीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची ही वेळ आहे. भारतीय संघाचं पुढील लक्ष्य २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपचं असणार आहे. त्यानुसार संघाची बांधणी आतापासूनच करायला हवी. तशा योजना अखायला हव्यात.’ असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

म्हणून बदल

टीम इंडियाला बळकट करण्यासाठी संघात बदल करणं आवश्यक आहे. रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्याची ही योग्य वेळ आहे. रोहित शर्मा कर्णधारपद सांभाळण्यासाठी मानसिकरित्या सक्षमही आहे. रोहितकडे कर्णधारपद देण्यासाठी विराट आणि संघव्यवस्थापकानेही समर्थन द्यावं. 

शास्त्रीही करणार पुन्हा अर्ज  

बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकांसह साहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवणार आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रवी शास्त्री यांचा करार संपत आहे. त्यामुळे शास्त्री यांना नव्याने अर्ज करावा लागेल. शास्त्री यांच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा विद्यमान साहाय्यक प्रशिक्षकांमध्ये समावेश आहे. या सर्वांना ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.  

धोनीबाबत विचार

विकेट किपर महेंद्रसिंग धोनीला संघातील आपलं स्थान गृहीत धरून चालणार नाही. धोनीची उणीव भरून काढणे सोपं नसलं, तरी आगामी स्पर्धेच्या दृष्टीने रिषभ पंतसारख्या युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळणे गरजेचं आहे, असा विचार निवड समिती करत असल्याचं समजत आहे. सध्या तरी धोनी आणि निवड समितीत कुठलाही संवाद झालेला नाही. 

पुढील बातमी
इतर बातम्या