क्रिकेटचेे भीष्माचार्य, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आंब्रे यांच्यासहीत मुंबई क्रिकेटमध्ये असंख्य खेळाडू घडवणारे पद्मश्री रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी सायंकाळी मुंबईत निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं असून ते ८७ वर्षांचे होते. क्रिकेट क्षेत्रातील त्यांच्या महान कार्याची दखल घेत सरकारनं त्यांनी पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांच्या निधनानं क्रिकेट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार अाहेत.
१९३२ साली जन्मलेले रमाकांत आचरेकर यांनी १९४३ सालापासून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीस सुरूवात केली आणि हीच कारकिर्द सर्वाधिक गाजली. प्रशिक्षक म्हणूनच त्यांची खरी ओळख जगाला झाली.
प्रशिक्षकपदाच्या काळात आचरेकर सरांनी अनेक शिष्य घडवले, पण सचिन तेंडुलकर-विनोद कांबळे हे त्यांचे खास शिष्य. या शिष्यांनी आपल्या स्वतच्या नावाबरोबरच आचरेकर सरांचं नावही एका मोठ्या उंचीला नेलं. तर आचरेकर सरांनीही या दोन्ही शिष्यांना शिष्य म्हणून नव्हे मुलाप्रमाणं सांभाळलं. त्यामुळे आचरेकर सर आणि सचिन-विनोद यांचं नातं हे गुरू-शिष्याच्या पलिकडंच होतं. आचरेकर सर गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. वयोमानामुळं ते घरातच होते. बुधवारी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं.