भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान रविवारी कोलकातामध्ये पहिली टी २० मॅच खेळवण्यात आली. ही मॅच भारताने जिंकल्याने क्रिकेटप्रेमी आनंदात असताना क्रिकेटर गौतम गंभीर मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)वर चांगलाच भडकला आहे. याचं कारण म्हणजे या मॅचची सुरूवात भारताचा माजी कप्तान मोहम्मद अझरूद्दीन याच्या हातून स्टेडियममधील मानाची घंटी वाजवून करण्यात आली. ही बाब गंभीरला खटकल्याने त्याने ट्विटरवरून बीसीसीआय, प्रशासकीय समिती (COA) आणि बंगाल क्रिकेट संघा (CAB)च्या कार्यप्रणालीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
गंभीरने ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारत आज इडन गार्डनमध्ये जिंकला. पण मला खेद आहे की बीसीसीआय, सीओए आणि सीएबी हारली. असं वाटतं की भ्रष्टाचारविरोधातील धोरण रविवारी सुट्टीवर होतं. मला ठाऊक आहे की त्यांना हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) ची निवडणूक लढवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरिही हा प्रकार आश्चर्यचकीत करणारा आहे. घंटी वाजत आहे, अपेक्षा आहे की शक्ती... ऐकत आहे.
अझरूद्दीनने भारतासाठी ९९ टेस्ट आणि ३३४ वन डे इंटरनॅशनल मॅच खेळल्या आहेत. मात्र त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लागल्यानंतर त्याची संपूर्ण कारकिर्द झाकोळली गेली. २००० मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर बंदी देखील घातली होती. परंतु आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये अझरूद्दीनवरील बंदी हटवली.
खेळाच्या मैदानाबाहेर अझरने क्रिकेट प्रशासनात जबाबदारी सांभाळण्याचाही प्रयत्न केला. जानेवारी २०१७ मध्ये तो हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवण्याचा विचार करत होता. परंतु त्यावेळेस त्याला अडवण्यात आलं. कारण बीसीसीआयने घातलेली बंदी हटवण्यात आली असली, तरी त्याबाबतही अस्पष्टता होती. त्यानंतर मात्र बीसीसीआयने अझरला असोसिएशनची निवडणूक लढवण्यास परवानगी दिली. सोबतच त्याच्यावरील बंदी हटवण्यात आल्याचंही स्पष्ट केलं.
हेही वाचा-
आयसीसीच्या 'हाॅल आॅफ फेम'मध्ये राहुल द्रविडचा समावेश
भारतीय क्रिकेट संकटात, गांगुलीने लिहिलं 'बीसीसीआय'ला पत्र