वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये होणार

कसोटी मालिकेत इंग्लंडचा ३-१ ने पराभव करत भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक दिली. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम कसोटी सामना १८ जून ते २२ जून या कालावधीत खेळवला जाणार आहे. याआधी हा सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार होता. मात्र कोरोना संकटामुळे हा सामना साउथम्पटन येथील रोझ बोल येथे खेळवला जाणार आहे. 

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बदलाची माहिती दिली. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा कसोटी मालिकांमध्ये पराभव करुन भारत पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. लॉर्ड्सऐवजी साउथम्प्टनमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी २३ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये काही वेळा येणारा पावसाचा व्यत्यय डोळ्यापुढे ठेवून राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा २०१९ ते २०२१ या कालावधीत खेळवण्यात आली. स्पर्धेला कोरोनाचा फटका बसला. यामुळे स्पर्धेत प्रत्येक संघाच्या जिंकण्याचं प्रमाण टक्केवारीत मोजण्यात आलं. स्पर्धेच्या नियमानुसार भारताने २०१९ ते २०२१ या कालावधीत खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी ७२.२ टक्के सामने जिंकले. तर न्यूझीलंडने ७० टक्के सामने जिंकले. 

अंतिम फेरीत फक्त एक कसोटी सामना आहे. हा सामना जिंकल्यास विजयी संघ पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा विजेता ठरेल. पण सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना कामगिरीच्या आधारे गुण दिले जातील. सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजयी ठरेल. 

पुढील बातमी
इतर बातम्या