एमआयजी आणि मारिया क्लबमध्ये अंतिम झुंज रंगणार

सहाव्या संतोष कुमार घोष अंडर-16 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत एमआयजी आणि मारिया स्पोर्ट्स क्लब या संघांनी धडक मारली आहे. एमआयजी संघाने मुंबई स्पोर्टिंग युनियन संघाला 39 धावांनी हरवून अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत मारिया स्पोर्ट्स क्लबने रेखा स्पोर्ट्स आणि मीडिया संघाला 135 धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

आझाद मैदानातील ससानियन मैदानावर झालेल्या लढतीत एमआयजी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शीश शेट्टी (35), हर्ष पाटील (32), असद शेख (50) यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर संघाने 45 षटकांत 7 बाद 186 धावांचे लक्ष्य उभारले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई स्पोर्टिंग युनियन संघाने शून्य धावांवर पहिली विकेट गमावली. मात्र यामीर सोराठीया (36) आणि शादाब खान (45) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची झुंजार भागीदारी रचली. अथर्व डाकवे याने शेट्टीला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर सौद मन्सूरी (21/3), शाश्वत जगताप (17/2) आणि डाकवे (19/2) यांनी टिच्चून गोलंदाजी करीत युनियनचा डाव 147 धावांतच गुंडाळला. या सामन्यात असद शेख सामनावीर ठरला.

पारसी सायक्लिस्ट येथे रंगलेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत मारिया स्पोर्ट्स क्लब संघाने रेखा स्पोर्ट्स आणि मीडिया विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 44 षटकांत 9 बाद 275 (14 दंड धावांसह ) धावांचा डोंगर रचला. अनुज भोर (40), फरहान शेख (23), अयाझ खान (78) आणि यजुवेन्द्र अवस्थी (35) यांनी संघाच्या धावसंखेत मोलाची भर घातली. तर रेखा स्पोर्ट्सतर्फे ऑफ स्पिनर अल्साद शेख याने 36 धावांत 4 बळी मिळवत गोलंदाजीत आपली चमक दाखवली. त्यानंतर फरहान खान (10/2) आणि अयाझ खान (33/3) या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी व सुमीत प्रजापती (33/2) यांनी रेखा स्पोर्ट्स संघाला 140 धावांत गुंडाळून संघाला मोठा विजय मिळवून दिला. अमित शर्मा (36) आणि साद शेख (49) यांनी एकाकी झुंज दिली. अयाझ खान याला सामनावीर घोषित करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या