भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीअाय) भारतीय संघात स्थान देताना यो-यो टेस्ट पार करणं खेळाडूंसाठी अनिवार्य केलं अाहे. याच धर्तीवर अाता मुंबई क्रिकेटमध्येही यो-यो टेस्टचा फाॅर्म्युला सुरू केला जाणार अाहे. अागामी मोसमासाठी म्हणजेच रणजी क्रिकेट अाणि विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी यो-यो या तंदुरुस्ती चाचणीचे निकष लावण्यात येणार अाहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवड समितीचा अध्यक्ष अजित अागरकर ही यो-यो टेस्ट अाता मुंबई क्रिकेटमध्येही सुरू करण्यासाठी अाग्रही अाहे.
पुढील मोसमासाठीच्या मुंबई संघाची घोषणा लवकरच केली जाणार अाहे. मात्र या संघातून सिनियर खेळाडू अभिषेक नायरला वगळण्यात अाल्याचे समजते. २२ खेळाडूंचा समावेश असलेली मुंबई संघाची यादी तयार करण्यात अाली अाहे. त्यानंतर लवकरत वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मुंबई संघाचा सराव सुरू होणार अाहे.
मुंबई उच्च न्यायालयाने एमसीएवर नियुक्त केलेले प्रशासक लवकरच अागरकरची भेट घेणार असून प्रशिक्षक निवडीसाठी चर्चा करतील. समीर दिघे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रवीण अमरे, अोमकार साळवी अाणि अमोल मुझुमदार हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असल्याचे समजते.
हेही वाचा -
अायपीएलमध्ये खेळण्यासाठी पार करावी लागणार यो-यो टेस्ट