टीम इंडियात (team india) सगळं काही ‘आॅल इज वेल’ आहे. माझ्यात आणि रोहीत शर्मामध्ये (rohit sharma) कुठलेही मतभेत नाहीत, असं सांगितलंय खुद्द विराट कोहली (Virat kohli)ने. टीम इंडिया वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाण्याआधी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने हा खुलासा केला.
इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप (CWC 2019) मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. हा वाद महेंद्रसिंग धोनी याला कुठल्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचं यावरून झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर या वादाने इतकं टोक गाठलं की रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर देखील अनफॉलो केलं. यावरून प्रसार माध्यमांमध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या. त्यामुळे या विषयावर विराट काय बोलणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.
यासंदर्भात विचारल्यावर विराट म्हणाला की, “मी सुद्धा बातम्यांमधून रोहीत शर्मा सोबत माझे मतभेद झाल्याचं ऐकलं आहे. पण यांत कुठलंही तथ्य नाही. संघात सारं काही आॅल इज वेल आहे. यशस्वी होण्यासाठी ड्रेसिंग रुममधलं वातावरण खूप महत्वाचं असते. ते चांगलं नसतं तर संघाचा परफाॅर्मन्स उंचावला नसता. ड्रेसिंग रुमचं वातावरणं कसं आहे हे तुम्ही स्वतः येऊ पाहा. कुलदीप यादव असो किंवा महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबतचे संबंध किती खेळीमेळीचे आहे, हे तुम्ही बघू शकता.
रोहीतसोबत माझे मतभेद असते, तर आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नसतो. मागच्या ४ वर्षांमध्ये आम्ही चांगल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला ७ व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर घेऊन आलो आहोत. अशा चर्चा होणं ही दुर्दैवाची बाब आहे. अशा चर्चा होण्यासाठी कोण बातम्या पेरतोय आणि त्याचा त्यांना काय फायदा होतोय हे माहीत नाही” असंही विराट म्हणाला.
भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला ३ ऑगस्टपासून सुरूवात होईल. ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले २ सामने फ्लोरिडा इथं खेळवण्यात येतील, तर तिसरा सामना गयाना इथं होईल. त्यानंतर ३ वन डे आणि २ कसोटी सामनेही होणार आहेत.
.
हेही वाचा-
भारतीय संघाला बदलाची गरज -रॉबिन सिंह
मुंबईकर अजिंक्य रहाणे ‘वन डे’ संघात का नाही? गांगुलीने केला निवड समितीला सवाल