मरिन ड्राइव्ह हिट अॅण्ड रनमध्ये इंटर्न डाॅक्टरचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

मरिन ड्राइव्हवर झालेल्या कार अपघातात दिपाली लहामाटे या २४ वर्षांच्या इंटर्न डाॅक्टरचा शुक्रवारी मृत्यू झाला. या हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपी शिखा झवेरी विरोधात मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवला आहे.

मागील ४ दिवसांपासून डाॅ. दिपालीची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर शुक्रवारी दिपालीची प्रकृती खालवल्याने तिची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कधी झाला अपघात?

मरिन ड्राइव्हच्या सिग्नलवर २४ मार्च रोजी दुपारी ३.२० वाजता भरधाव वेगात कार चालवत असलेल्या शिखा झवेरीने रस्ता ओलांडत असलेल्या डॉ. दिपालीला जोरदार धडक दिली. या धडकेत नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयात इंटर्न म्हणून कामाला असलेल्या दिपालीला जबर दुखापत झाली. जे. जे. जिमखान्यात त्यांचा कॉन्व्होकेशन कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला जात असताना दिपालीला हा अपघात झाला.

दुचाकीस्वाराने पकडलं

या अपघातानंतर शिखाने तिथून पळ काढला. मात्र एका दुचाकीस्वाराने शिखाचा पाठलाग करून तिला अडवत पोलिसांच्या हवाली केलं. हा अपघात इतका गंभीर होता की, दीपाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी दिपालीला तात्काळ भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं ४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दिपालीची प्राणज्योत शुक्रवारी मालवली.

गुन्ह्यात वाढ

दिपाली यांच्या भावाने त्यांचे अवयव दान करणार असल्याचं सांगितलं. या प्रकरणी शिखावर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र न्यायालयाने शिखाला जामिनावर मुक्त केलं. दिपाली यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी शिखावरील गुन्ह्यांच्या कलमात वाढ केली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शिखा विरोधात नोंदवला असल्याचं वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास गंगावणे यांनी सांगितलं.


हेही वाचा-

एकतर्फी प्रेमातून २१ वर्षाच्या तरुणीवर ब्लेडने हल्ला

भंगार की गाडी सस्तेमे..


पुढील बातमी
इतर बातम्या