फुकटचा सल्ला तरुणाला पडला महागात!

परळ येथील एम.डी.कॉलेज समोर मैत्रिणीचे खुले आम चुंबन घेणाऱ्या तरुणाला समजावणे गणेश शहाणे(27) नावाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तरुणाला समजावणाऱ्या गणेशवर 9 ते 10 जणांच्या जमावाने हल्ला केला असून, त्यात तो जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एम. डी. कॉलेज जवळ गोवंडीला राहणारा माँटी नावाचा तरुण आपल्या मैत्रिणीचे खुलेआम चुंबन घेत होता. हा प्रकार शापुरजी पालनजी कॉलनीमध्ये राहणाऱ्या गणेशने बघितला आणि त्याला रहावले नाही. तो माँटीला समजावू लागला, पण त्याचा त्या तरुणाला राग आल्याने त्याने त्याच्या आसपासच्या मुलांना आणून त्याने गणेशवर हल्ला केला. त्याचा राग इतका अनावर झाला की, त्याने बिअरची फुटलेली बॉटल गणेशच्या पोटात भोसकली आणि तिथून पळ काढला.

दरम्यान, या प्रकरणी काळा चौकी पोलिसांनी सूरज तेली(27) याला अटक केली असून, पोलिस माँटीसह इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या