मोबाइलमुळे सापडला हत्येतील आरोपी; दिल्लीतून जेरबंद

मुंबईतील आग्रीपाडा परिसरात क्षुल्लक कारणावरून मित्राचीच हत्या करून मृतदेह आग्रीपाडा येथील गोडाऊनमध्ये लपवून फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने मृताच्या मोबाइलवरून फोन करून तो जिवंत असल्याचे भासवले. मात्र, त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

चाकूने हल्ला 

मुंब्राच्या अमृतनगर परिसरात कुटुंबियांसोबत राहणारा मोहम्मद शकील उर्फ सय्यद अली (२२) आग्रीपाडा येथे एका गोडाऊनमध्ये कामाला होता. त्याच ठिकाणी राजबाबू मुनिजर अली हा कामाला होता. २५ नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. दोघेही नशेत होते. त्यावेळी राग अनावर झालेल्या राजबाबूने शकीलला मारहाण करत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्यात गंभीर जखमी होऊन शकीलचा जागीच मृत्यू झाला. राजबाबूने शकीलचा मृतदेह गोडाऊनच्या एका कोपऱ्यात नेला. तसंच त्याचा मोबाइल घेऊन गोडाऊन बंद करून पळ काढला. त्यानंतर शकीलच्या मोबाइलवरून राजबाबूने शकीलच्या घरी फोन करून तो गोडाऊनमध्येच थांबत असल्याचं सांगितलं. 

उग्र वास 

त्यानंतर राजबाबूने शकीलचा मोबाइल विकून दिल्लीला पळ काढला. शकील दोन दिवसांपासून घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. २८ नोव्हेंबर रोजी गोडाऊनमधून उग्र वास येऊ लागल्यामुळे गोडाऊनच्या मालकाने एका कर्मचाऱ्याला साफसफाई करण्यासाठी सांगितले. त्यावेळी त्याने गोडाऊन उघडल्यानंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला. 

मोबाइलवरून माग

पोलिसांनी शकीलच्या मोबाइलचा शोध घेतला असता मोबाइल राजबाबू नावाच्या व्यक्तीने त्याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राजबाबूवर लक्ष केंद्रीत केले. पोलिसांना राजबाबू हा त्याच्या दिल्ली येथील नातेवाईकांकडे लपला असल्याचे कळल्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी  दिल्ली गाठत राजबाबूला अटक केली. 


हेही वाचा - 

पैशासाठी दलालाला डांबून अश्लील चित्रीकरण

मुलांच्या तस्करीप्रकरणी महिलेला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या