कुख्यात गुंड एजाज लकडावाला याला तब्बल २३ वर्षानंतर अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. एजाजविरोधात हत्या, खंडणीसारख्या ८० हून अधिक तक्रारी असून मुंबईत २५ गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच एजाजची मुलगी सोनिया अडवानी हिला अटक केली होती. तिच्या चौकशीतून एजाजचा थांगपत्ता लागला आहे.
जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या - मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच 'डी गँग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर २ हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना १९९७ मध्ये त्याला नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता.
त्या दिवसापासून पोलिस त्याच्या मागावर होते. त्यामुळे एका ठिकाणी स्थिर न राहता एजाज वारंवार आपली जागा बदलायचा. वेगवेगळ्या नावाने एजाज तब्बल ७ ते ८ देशात वावरत होता. २००० मध्ये मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंडांविरोधात रान उठवले असताना२००६ मध्ये एजाजने त्याच्या कुटुंबियांना परदेशात हलवण्याचे ठरवले. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो त्याची पत्नी उमा थडानी, मुलगा आणि मुलीला परदेशात नेण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला. त्यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबावर २००६ मध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याने त्याच्या पत्नीचे नाव उमा थडानी बदलून रेखा अडवानी हे नाव पासपोर्टवर नोंदवले होते.
१९९३ च्या स्फोटानंतर छोटा राजन आणि दाऊद यांच्यात वैमनस्य आले. त्यावेळी एजाज राजनसोबत वेगळा झाला होता. मात्र डी कंपनीकडून वाढता धोका पाहता त्याने राजनच्या परवानगीनेच स्वत:ची वेगळी टोळी बनवली. मात्र तरीही एजाज राजनसाठी अधूनमधून काम करायचा. मात्र पोलिसांनी त्याच्या टोळीतील महत्वाच्या म्होरक्यांची धरपकड केल्यानंतर मुंबईतील त्याचे वर्चस्व कमी झाले होते. त्यातच फेब्रुवारी २०१९ मध्ये खंडणी विरोधी पथकाने एजाजचा भाऊ अखिल युसूफ लकडावाला याला हाजीअली येथून अटक केली.
हेही वाचा-
दाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडावालाला अटक