अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी बनून घरात छापा, १ लाख लंपास

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी बनून घरावर छापा टाकून १ लाख रुपये लंपास केल्याची घटना माहीममध्ये घडली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

नाझिया अब्दुल रहीम शेख यांनी या प्रकरणी माहीम पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. १४ तारखेच्या रात्री पहाटे ४ वाजता काही लोकांनी नाझिया यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. नाझियाने दरवाजा उघडताच तोंडावर मुंबई पोलिसांचा लोगो असलेला मास्क घातलेले दोघे जण उभे होते. आपण अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असून या घरात ड्रग्सची तस्करी केल्याचा संशय आहे. त्यामुळे घराची झडती घ्यायची असल्याचं दोघांनी नाझियाला सांगितलं. घाबरलेल्या नाझियाने दोघांना घरात येण्याची परवानगी दिली. 

घरात शिरताच त्यांनी नाझियाचा मोबाईल ताब्यात घेऊन कारवाई होईपर्यंत मोबाईल त्यांच्याकडंच राहील असं सांगितलं. त्यानंतर संपूर्ण घराची त्यांनी तपासणी केली. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. शेवटी दरवाजाच्या मागील बाजूस लटकलेल्या नाझियाच्या पर्सवर त्यांची नजर पडली. या पर्समध्ये त्यांना एक लाख रुपये सापडले.

आम्ही दोघेही पैसे घेऊन खाली जात आहोत. पोलिसांची गाडी खाली उभी आहे, त्यात आमचे वरिष्ठ अधिकारी असून तुम्ही खाली घेऊन त्यांना पैशांची माहिती द्या आणि पैसे परत घेऊन जा. नाझिया पटकन तयार होऊन खाली आल्या. मात्र खाली पोलिसांची गाडी किंवा पोलीस उभे नव्हते. आपली फसवणूक झाल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

पोलिसांनी काही तासातच सरफराज शब्बीर अहमद अंसारी उर्फ पापा आणि अमोल धर या दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी दोघांकडून ८३ हजार रुपये जप्त केले आहेत.


हेही वाचा -

मुंबईतील नेहरूनगर, टिळकनगरमध्ये वेगाने कोरोना रुग्णवाढ

नागरिकांच्या सुरक्षेसाठी धारावीत पुन्हा चाचण्यांत वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या