मुंंबईत 'स्ट्रीट पार्किंग' ची नवी संकल्पना, पार्किंगसाठी शुल्क आकारणार

मुंबईत वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. पालिकेने उभारलेल्या पार्किंग परिसरातील ५०० मीटर परिसरात गाड्यांना पार्किंग मिळाली खरी, मात्र ज्या ठिकाणी पार्किंग नाही त्या ठिकाणी आता 'स्ट्रीट पार्किंग' ही नवी संकल्पना वाहतूक पोलिस आणि पालिका मुंबईत अंमलात आणणार आहे. याबाबत पालिका आणि वाहतूक पोलिस सर्व्हे करत असून तो अंतिम टप्यात आहे.

मुंबईतील वाहतूक हा आता  चर्चेचा विषय बनला आहे. एकेकाळी शिस्तबद्ध सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईील वाहतूक कोंडी ही सगळ्यात मोठी डोकेदुखी व पर्यावरणाला धोकादायक ठरत आहे. एकेकाळी ८० टक्के असलेला हा सार्वजनिक वाहतुकीचा वाटा आजमितीला ६० ते ६५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. खासगी गाड्या, दुचाकी, ऑटो, टॅक्सी यांचे प्रमाण  २० टक्क्यांवरून आता ३५ ते ४० टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करत आहेत. या वाहन धारकांकडून पालिका 'स्ट्रीट पार्किंग' अंतर्गत कर वसूल करणार आहे. सध्या मुंबईच्या महत्वाच्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांचा आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा पालिका आणि वाहतूक पोलिस सर्व्हे करत आहे. हा सर्व्हे शेवटच्या टप्यात असून लवकरच 'स्ट्रिट पार्किंग'ची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

या ठिकाणी पार्किंगला मज्जाव

  • महर्षी कर्वे मार्ग – दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशन ते ऑपेरा हाऊस या दरम्यानच्या सुमारे साडे तीन किलोमीटर अंतराच्या महर्षी कर्वे मार्गावर
  • स्वामी विवेकानंद मार्ग – पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्गावर जुहू एअरपोर्ट ते ओशीवरा नदीपर्यंतच्या ६ किलोमीटरच्या अंतरापर्यंत.
  • न्यू लिंक रोड – पश्चिम उपनगरातील ‘न्यू लिंक रोड‘वर डी. एन. नगर मेट्रो स्टेशन ते ओशीवरा नदीपर्यंतच्या सुमारे २ किलोमीटरच्या अंतरावर.
  • लाल बहादूर शास्त्री मार्ग – पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर कल्पतरु ते निर्मल लाईफस्टाईल या दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटर अंतरावर.
  • गोखले मार्ग – दक्षिण मुंबईतील दादर परिसरातील गोखले मार्गावर पोर्तुगिज चर्च ते एल. जे. जंक्शन दरम्यानच्या मार्गावर.

ज्या मार्गावर पार्किंगला मनाई करण्यात आली आहे तिथे लगतच्या परिसरात असणाऱ्या सशुल्क वाहनतळाबाबत माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत.


हेही वाचा -

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी वाहतूक महामार्ग पोलिस सज्ज

जे.डे. हत्या प्रकरण: जिग्ना वोरा निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय


पुढील बातमी
इतर बातम्या