अखेर अभिनेता करण ओबेराॅयला जामीन

एका महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला अभिनेता करण ओबेराॅय याला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला.  

 जामीनासाठी प्रतीक्षा

करणच्या कुटुंबीयांनी याआधी दिंडोशी महानगर दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याने करणला तुरूंगातच राहावं लागलं. त्यानंतर करणच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. 

कधी झाली होती अटक?

करणने आपल्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवला. तसंच हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आपल्याकडून पैसे उकळल्याची तक्रार पीडित महिलेने ओशिवरा पोलिसांत केल्यावर पोलिसांनी त्याला ५ मे रोजी ताब्यात घेतलं. करणला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. 

 खोटी तक्रार

बलात्कार प्रकरणाचा अद्याप तपास पोलीस सुरू असल्याने आरोपीला जामीन देणं योग्य होणार नाही अशी बाजू पीडित महिलेच्या वकिलाने न्यायालयासमोर मांडली. तर आपण पीडित महिलेला कधीही लग्नाचं आमिष दाखवलं नाही. असं असूनही आरोपीला अटकेत ठेवणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखं आहे. आपल्याला जामीन मिळू नये म्हणून महिलेने हल्ल्याची  खोटी तक्रार केली. पोलीस तपासात देखील हे सिद्ध झाल्याचं करणने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यावर करणला जामीन मंजूर करण्यात आला. 


हेही वाचा-

करण ओबेराॅयचा जामिन अर्ज फेटाळला

करण ओबेराॅयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


पुढील बातमी
इतर बातम्या