मुंबई विमानतळावरील सहारा कार्गो काँम्प्लेक्समध्ये काम करणाऱ्या सीमा शुल्क अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने उत्त्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सद्गुरू शरण उपाध्याय असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर दोन कोटी ८९ लाख रुपये अधिकची असंपदा त्याच्याकडे असल्याचा आरोप आहे.
एअर कार्गोमार्फत आलेला माल सोडण्यासाठी उपाध्याय आयात-निर्यात कंपनीच्या कर्मचा-याकडे लाच मागायचा. या प्रकरणी एका कर्मचाऱ्याने सप्टेंबर महिन्यात उपाध्याय विरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार उपाध्यायवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी उपाध्याय यांच्या घरी शोध मोहिम राबवली असता त्याच्या घरी पाच लाख ५० हजारांची रोख, तसेच नेरूळ येथे तीन फ्लॅट, खारघर व वाशी येथे तीन दुकाने, खारघर येथे दोन फ्लॅटची खरेदी व त्यानंतर विक्री, लखनौ येथे जामीनीची खरेदी व विक्री, कर्जत येथे शेतजमीन खरेदी केल्याची कागदपत्रे सापडली. त्यातील काही मालमत्ता त्यांच्या पत्नीच्या नावे होत्या, अशी माहिती सीबीआयच्या अधिका-याने दिली.
त्यानंतर या सर्व मालमत्तेबाबत चौकशी करण्यात आली. आठ महिने चाललेल्या या तपासानंतर उपाध्याय यांनी दोन कोटी ८९ लाखांची असंपदा जमा केल्याचे निष्पन्न झाले. एप्रिल २००५ ते २६ सप्टेंबर,२०१८ या कालावधीत ही मालमत्ता जमा करण्यात आली. याप्रकरणी उपअधिक्षक दर्जाचा अधिकारी अधिक तपास करत असल्याची माहिती सीबीआयच्या अधिका-याने दिली.
हेही वाचा