नालासोपारा आणि वसई परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी अद्याप ओसरलं नाही. तुंबलेल्या पाण्यामुळे या परिसरात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. परिणामी नागरिकांचे चांगलेच हाल झाले. विजेअभावी मोबाइल चार्ज करता न अाल्याने अनेकांचे मोबाइल बंद पडले होते. पण यावर त्यांनी चांगलाच तोडगा शोधून काढला.
चक्क रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्हींचे प्लग काढून या लोकांनी मोबाइल चार्ज केले. या सर्व उपद्व्यापामुळं मात्र स्थानकांवरील सीसीटीव्ही तब्बल ३ दिवस बंद होते. त्यामुळे परिस्थितीचा आढावा रेल्वे प्रशासनाला घेता आला नाही. या प्रकरणी रेल्वेने १७ जणांवर गुन्हा दाखल केला अाहे.
विजेअभावी मोबाइल बंद
मुंबईसह नालासोपारा व वसई परिसरात ८,९ आणि १० जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे नालासोपारा आणि वसई परिसरात ठिकठिकाणी पाणी तुंबलं. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तीन दिवस उलटले तरी परिसरातील पाणी अद्याप कमी झालेलं नाही. वीज नसल्याने मोबाइल चार्ज करता न अाल्याने अनेकांचे मोबाइल बंद पडले. त्यामुळे त्यांचा संपर्कही तुटला.
सीसीटीव्हींचे प्लग उपसले
अशातच रेल्वे स्थानकावर मात्र वीज पुरवठा सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर अनेक नागरिकांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली. स्थानकांवर असलेल्या सीसीटीव्हींचे प्लग उपसून त्यांनी चार्जरच्या मदतीने आपला मोबाइल चार्ज केला. एकानं हे कृत्य केल्याचं पाहिल्यानंतर अनेकांनी परिसरातील सीसीटीव्हींचे प्लग उपसून मोबाइल चार्ज करून घेतले. हेच दृश्य वसई स्थानकावरही पहायला मिळाले.
सीसीटीव्ही बंद असल्याने रेल्वेला नियंत्रण कक्षातून स्थानक परिसरातील आढावा घेता अाला नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वेने त्यांच्या संपत्तीचं नुकसान आणि दुरूपयोग केल्याबद्दल १७ जणांविरोघात गुन्हे नोंदवले आहेत. या १७ जणांवर लवकरच अटकेची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
कल्याणमध्ये खड्ड्याचा आणखी एक बळी
परदेशी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला चेन्नईतून अटक