विक्रोळीत डान्स इंडिया डान्स फेम संज्योत घागची आत्महत्या, कारण अस्पष्ट

'डान्स इंडिया डान्स' आणि 'बुगीवुगी' या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतलेल्या डान्सर संज्योत घाग (२७) याने विक्रोळीतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

घरी कुणीही नसताना केली आत्महत्या

पेशाने डान्सर असलेला संज्योग विक्रोळीतल्या कन्नमवारनगर येथील इमारत क्रमांक ८८ मध्ये आई, वडील आणि लहान भावासोबत राहात होता. गुरुवारी संध्याकाळनंतर घरात कुणीही नसताना त्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याची आई जेव्हा घरी परतली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा का उघडत नाही म्हणून खिडकीतून पाहिले असता संज्योत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर तातडीने दरवाजा तोडून संज्योतला पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

संज्योत नृत्यात माहीर असून त्याने स्वतःची सिल्व्हर स्टेपर्स नावाची डान्स अकॅडेमी उघडली होती. विक्रोळी परिसरात एक उत्तम डान्सर म्हणून तो प्रसिद्ध होता. दूरचित्रवाहिनीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या डान्स शोमध्ये संजोतच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या ग्रुपने सहभाग घेतला होता.

'संज्योतने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही, तरी तपास सुरू आहे', असे विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.


हेही वाचा

तुमचा डॉक्टर कितवी शिकलाय? गोवंडीत ८वी पास बोगस डॉक्टरला अटक!

पुढील बातमी
इतर बातम्या