रेमो डिसुझाला अडकवण्यासाठी त्यागीने रचला स्वत:च्या हत्येचा कट

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डायरेक्टर रेमो डिसुझा याला अडकवण्यासाठी २०१७ मध्ये स्वत:वर जीवघेणा हल्ला घडवून आणल्याची धक्कादायक कबुली आरोपी निर्माता सत्येंद्र त्यागीने पोलिसांकडे दिली. 'डेथ ऑफ अमर' या सिनेमावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी रेमोला धमकावण्यासाठी त्यागीने गँगस्टर रवी पुजारी याला ही सुपारी दिल्याचं उघड झालं.

म्हणून दिली हत्येची सुपारी

'डेथ ऑफ अमर' या सिनेमासाठी निर्माता सत्येंद्र त्यागी व दिग्दर्शक रेमो डिझुसा हे एकत्र काम करत होते. या सिनेमात अभिनेता राजीव खंडेलवाल प्रमुख भूमिकेत दिसणार होता. मात्र आर्थिक व्यवहारातून या सिनेमाचं काम थांबलं. या सिनेमात त्यागीचे ५ कोटी रुपये गुंतले होते. तरीही सिनेमाला आलेला खर्च परत मिळवा म्हणून इन्श्युरन्स कंपनीला देण्यासाठी रेमोकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र त्यागीला मिळत नव्हतं. अखेर हा वाद विकोपाला गेल्याने त्यागीने पैशांसाठीव 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळण्यासाठी गॅंगस्टर रवी पुजारीला रेमो डिसुझाची सुपारी दिली.

एकमेकांवर केले आराेप

या प्रकरणात दोघांनीही एकमेकांवर फसवणुकीचे आरोप केले होते. दरम्यान, याप्रकरणी गॅंगस्टर रवी पुजारीने रेमोला फोन करून त्यागीला ५ कोटी रुपये परत करण्याची धमकी दिली होती. तसंच त्यागीला ना हरकत प्रमाणपत्रासोबत ५० लाख रुपये दे, अशी मागणीही पुजारीने या वेळी केली होती. रेमोने त्याला प्रतिसाद न दिल्याने रेमोची पत्नी लिझेल डिसोझा हिलाही धमकीचे फोन आले. अखेर तिच्या तक्रारीवरून या प्रकरणी भादंवि कलम ३८५, ३८७ व ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

यूपीत खोटी तक्रार

याआधी रेमोच्या सांगण्यावरून त्यागीने रवी पुजारीचा शुटर गुंडा प्रसाद आपल्याला धमकावत असल्याची खोटी तक्रार उत्तर प्रदेशातील सिहानी गेट पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार रेमो विरोधात गुन्हाही दाखल केला होता. त्या वेळी त्यागी व पुजारीचं संभाषण यू-ट्युबवरही अपलोड केलं होतं.

स्वत:वर झाडली गोळी

पण, आता मुंबई पोलिसांच्या तपासात त्यागीवर झालेला गोळीबार त्यानेच घडवून आणला होता. त्यासाठी मित्राच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरचाही वापर केला होता. हे सर्व रेमोला अडवण्यासाठी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यासाठीच त्यागी गॅंगस्टर रवी पुजारीच्या संपर्कात होता. त्यासाठी तो पुजारीचा हस्तक कमरुद्दीनलाही भेटल्याचंही पुढं आलं आहे. त्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती.


हेही वाचा-

गँगस्टर रवी पुजारीकडून रेमो डिसोझाला खंडणीसाठी धमकी

'पोकर गेम'च्या संचालकाला धमकावणारा अटकेत


पुढील बातमी
इतर बातम्या