गायक राँडनीसह त्याने अन्य पाच जणांची ही केली फसवणूक

प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडीस याच्या फसवणूकी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मयुर अग्रवाल याला काही दिवसांपूर्वी  अटक केली होती. या गुन्ह्यात मयुरने अन्य पाच जणांना ही अशा प्रकारे गंडवल्याचे तपासात पुढे आले आहे. या पाच ही जणांनी पोलिसांकडे मयुर अग्रवाल विरोधात तक्रार नोंदवल्याने फसवणूकीची रक्कम ही 23 कोटींवर पोहचली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 (एमपीआयडी) अंतर्गत कलमात वाढ केली आहे. 

नेमके काय आहे प्रकरण 

रॉडनीचा 'राँडनी एन्टरटेन्मेट'  नावाचा प्रसिद्ध बँड आहे.  2015 मध्ये रॉडनीची ओळख मयुर अग्रवाल याच्यासोबत झाली. त्याने त्याचे गुजरातमधील मामा संजय अग्रवाल यांच्यामार्फत जमिनीमध्ये पैसे गुंतवून  18 ते 22 टक्के परतावा देण्याचे आमीष राँडनीला दाखवले. त्यानुसार ऑक्टोबर 2015 पासून रॉडनीने त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तसेच रॉडनीने यापूर्वी खरेदी केलेले सोन्याचीही अग्रवालांकडे गुंतवणूक केली. असे एकूण 15 कोटी साठ लाख रुपये 2018 पर्यंत अगरवालकडे जमा करण्यात आले.  सुरुवातीला 2016 पर्यंत रॉडनीला अग्रवालने नियमित व्याजाचे पैसे दिले त्यामुळे त्याच्या बॅण्डमधील इतर 9 सदस्यांनीही अग्रवालांकडे सुमारे दोन कोटी पंधरा लाख रुपये गुंतवले. 

गुंतवलेल्या पैशांचा अपहार 

2017 ला मयूर अग्रवाल व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागल्यानंतर रॉडनी याने त्याचा पाठपुरावा केला. त्यावेळी त्याने मामाकडे दिलेली रक्कम गोरेगाव मधील एका कंपनीत गुंतवल्याचे  सांगितले.  त्यावेळी रॉडनी ने गोरेगाव येथे संजय अग्रवालची भेट घेतली.  सुरतमध्ये जमिनीमध्ये सुमारे आठ कोटी रुपये गुंतवण्यात आल्याचे सांगितले. तसेच सहा कोटी रुपये मयूरने पुण्यातील याचा मित्र  नितीन लोहादीया यांच्याकडे गुंतवल्याचे सांगितले. रॉडनी याने वांद्रे येथे लोहारिया यांची भेट घेतली. त्यावेळी त्याने मयुरने दिलेले पैसे  हे शेअर मार्केटमध्ये गुंतवले असल्याचे रॉडनीला सांगितले. 

तक्रारदारांच्या संख्येत वाढ

2017 नंतर व्याजाची रक्कम मिळण्यास बंद झाल्यामुळे रॉडनी व त्याच्या सहकलाकारांनी 17.77  कोटींची फसवणूक  झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली. त्यानुसार या प्रकरणी  संजय अग्रवाल, मयूर अग्रवाल बंगेरा व लोहादीया यांच्याविरुद्ध  25 फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नुकतीच मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मयुर अग्रवाल याला अटक केली. मयुरच्या चौकशीत त्याने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले. या तक्रारदारांनी आता पोलिसात मयुर विरोधात तक्रार नोंदवली आहे. या पाच ही तक्रारदारांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारदारांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

हेही वाचा

कंपनीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा अकाउन्टंट अटकेत

राज्याच्या माजी महसूलमंत्र्यांच्या नावानं जमिन घोटाळा

पुढील बातमी
इतर बातम्या