परदेशी नागरिक असल्याची बतावणी करून खरेदीच्या नावाखाली दुकानात शिरून चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पोलिस शोध घेत आहेत. मुलुंडमध्ये नुकतंच या टोळीने एका दुकानातून महागडा मोबाइल चोरल्याचं सीसीटिव्हीत कैद झालं आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात दुकान मालकाने तक्रार केली असून पोलिस वस्तूस्थिती पडताळून पाहत आहेत.
मुलुंड पूर्वेला फडके रोडवर निल टेलीकाॅम हे मोबाइलचं दुकान आहे. सोमवारी दुपारी दुकानात एक महिला आणि दोन उच्चभ्रू नागरिक आले. आपण परदेशी नागरिक असल्याचे सांगत महिलेने दुकान मालक प्रकाश लोहार यांना मनी एक्सचेंज करून देण्याची विनंती केली. यावेळी महिलेसोबतचा व्यक्ती दुकान मालकाशी बोलत असताना महिलेने दुकानातील कर्मचाऱ्यांना मोबाइल दाखवण्यास सांगत बोलण्यात गुंतवलं. तर तिसऱ्या महिलेने हातचलाखीने त्यातील एक मोबाइल बॅगेत टाकला. त्यानंतर काही क्षणात हे तिघेही दुकानातून निघून गेले.
सीसीटिव्हीतून उघडकीस
मोबाइल पुन्हा ठेवताना एक मोबाइल कमी असल्याचं दुकान मालक प्रकाश लोहार यांच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी दुकानातील सीसीटिव्हीत पाहिले असता त्या परदेशी महिलेने मोबाइल चोरल्याचं दिसून आल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी प्रकाश यांनी दिलेल्या तक्रारीची मुलुंड पोलिस पडताळणी करत असून त्या संशयित महिलांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा -
गोरेगावात शाॅक लागून एकाचा मृत्यू
वांद्र्यात पैशांच्या व्यवहारातून महिलेची गळा चिरून हत्या