नामांकित हिरे व्यापारी कंपनीची 18 कोटींची फसवणूक

देशातील नामकिंत हिरे व्यापारी कंपनीपैक एक असलेल्या महिंद्रा ब्रदर्स एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीची सुरतच्या एका खासगी कंपनीने 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिंद्रा ब्रदर्सने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे.

कशी केली फसवणूक?

वांद्रे कुर्ला संकुल येथे असलेल्या महिंद्रा ब्रदर्स कंपनीचे समुह सल्लागार हिरेन मेहता हे दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथून कच्चे हिरे मागवतात. त्यानंतर नवसारी, गुजरात येथील कारखान्यात हिऱ्यांवर पॉलिशिंग केल्यानंतर उर्वरीत पॉलिशिंग आणि इतर कामांसाठी करार करण्यात आलेल्या सुरतच्या डी. चेतन अँड कंपनीकडे पाठवतात. 2017 मध्ये महेंद्रा कंपनीने डी. चेतन कंपनीचे घनश्याम केवडिया, दिनेश केवडिया आणि हरिकृष्ण केवडिया यांच्या कंपनीकडे हिरे पॉलिशिंगसाठी पाठवले.

सुरुवातीला केवाडिया यांनी यशस्वी व्यवहार करत महिंद्रा कंपनीचा विश्वास संपादन करून घेतला. त्या पार्श्वभूमिवर केवाडिया यांनी मंहिंद्रा कंपनीकडून पॉलिशिंगसाठी मोठ्या प्रमाणात हिरे मागवले. मात्र त्यातील केवडिया यांनी एप्रिल ते जून 2018 या कालावधीत 12 कोटी 6 लाख रुपयांचे घेतलेले हिरे परत केले नाही.

गुन्हे शाखेकडे तक्रार

मार्च ते जुलै 2018 या कालावधीत विक्री करण्यात आलेले सहा कोटी एक लाख रुपयांची रक्कमही कंपनीला देण्यात आली नाही. याबाबत केवडिया यांच्याशी कंपनीने संपर्क साधला असता त्यांनी दरवेळी मुदत मागून घेतली. पण अद्याप पैसे अथवा हिरे दिले नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्यात मेहता यांनी याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या