बड्या प्रोडक्शन हाऊसच्या विभाग प्रमुख असलेला मेक अप आर्टीस्ट सूरज गोडांबेला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) गुरूवारी अटक केली. गेल्या काही वर्षात गाजलेल्या चित्रपटांसाठी त्याने काम केले आहे. सूरजकडून कोकेनचे १५ छोटे बॉक्स सापडले आहेत. त्या प्रत्येक बॉक्समध्ये ११ ग्रॅम कोकेन असल्याचे अधिका-याने सांगितले. ती कोकेनच्या सेवन प्रमाणापेक्षा अधिक मात्र व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी असल्याचेही या अधिका-याने सांगितले. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचाः- गुड न्यूज! आता सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त
गोडांबेला ड्रग्स पेडलरसह अटक करण्यात आली आहे. दोघांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या माध्यमातून बड्या सेलेब्रीटींना कोकेन पुरवण्यात येत होते का, याबाबत एनसीबी तपास करत आहे. बुधवारी एनसीबीने अंधेरी पश्चिम परिसरात विशेष मोहिम राबवली. रिगेल महाकाला याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीनंतर ओशिवरा परिसरातही शोध मोहिम राबवण्यात आली. त्याच्या चौकशीत उच्च प्रतिचे मलाना क्रीम(हशीश), अफीम व १६ लाख रुपये रोख जप्त करण्यात आली होती त्यांची किंमत दोन कोटी ६२ लाख रुपये आहे. याप्रकरणी आणखी ड्रग्स वितरक मोहम्मद आझम जुम्मन शेख याला अटक करण्यात आली होती. त्याच्या संपर्कात काही हायप्रोफाईल व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचाः- सर्वांसाठी लोकल पुढच्या वर्षातच? महापालिका आयुक्त म्हणाले...
१४ जूनला अभिनेता सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्स तस्करांविरोधात विशेष मोहिम सुरू केली आहे. त्या अंतर्गत अनेक बड्या तस्करांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी यापूर्वच अभिनेता अर्जून रामपाल व त्याची प्रेयसी गेब्रिल्ला डेमेट्रीअॅडेस यांची चौकशी केली आहे. अर्जुनने यापूर्वीच या सर्व आरोपांचे खंडन करत आपले ड्रग्सशी घेणे देणे नसल्याचे सांगितले होते. त्यापूर्वी याप्रकरमी गेब्रिल्ला डेमेट्रीअॅडेसचा भाऊ अँगिसिलाऊस याला अटक केली होती. १८ ऑक्टोबरला लोणावळा येथे त्याच्याकडून ड्रग्स जप्त करण्यात आले होते. तसेच अर्जून रामपालची चौकशी झाली, त्या दिवशीच एनसीबीने पॉल बार्टेलची चौकशी केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.