खड्ड्यांमुळे नवजात बाळाच्या डोक्यावरील पितृछत्र हरवलं

रस्त्यावरील खड्ड्यामुळं गाडीचा अपघात होऊन ३० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीमध्ये घडली. गणेश शांताराम पाटील (३०) असं या तरुणाचं नाव आहे. भिवंडी-वाडा या रस्त्यावरून दुचाकी नेत असताना खड्ड्यात अडकून तरुण गंभीर जखमी झाला. त्यावेळी उपचारासाठी त्याला ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. गणेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघे २३ दिवसांचं बाळ आहे.

भिवंडी-वाडा मार्गावरील घटना

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास गणेश दुचाकीवरून घरी परतत असताना भिवंडी-वाडा मार्गावरील पालखने गावाजवळील खड्ड्यामुळे गणेशची दुचाकी उडाली आणि काहीशा अंतरावर जाऊन डिव्हायडरला आदळली. त्यावेळी येथील ग्रामस्थांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

ग्रामस्थांनी केला रास्तारोको

भिवंडी-वाडा रस्त्यावर झालेल्या अपघतामुळे ग्रामस्थांनी गणेशचा मृतदेह घेऊन तेथे रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळं मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या मार्गावरील खड्डयांमुळे याआधीसुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हा रस्ता बीओटी तत्तावर सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. त्यामुळं या कंपनीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. गणेशच्या मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या