फेसबुक वापरताय? मग ही बातमी वाचाच

केंब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा चोरी प्रकरणानंतर फेसबुक चांगलंच वादात सापडलं होतं. हे प्रकरण शांत होतं नाही, तोच फेसबुकसमोर हॅकर्सची आणखी एक मोठी अडचण उभी राहिली आहे. नागरिकांचं फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यांच्या अकाऊंटवरून त्यांच्याच मित्रांना पैशांची मदत करण्याचं सांगून त्यांची फसवणूक करण्याचा नवीन प्रकार सायबर चोरट्यांनी सुरू केला आहे. अशाच एका हॅकरला वांद्रे पोलिसांनी राजस्थानच्या जोधपूर येथून अटक केली आहे. दिप्तेश सलेच्छा असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात मुंबईतही विविध पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे.

अशी केली फसवणूक

राजस्थानच्या जोधपूरच्या राहणाऱ्या दिप्तेशने काही दिवसांपूर्वी वांद्र्यातील एका व्यक्तीचं फेसबुक अकाऊंट हॅक केलं होतं. त्यानंतर त्याने त्याच्या खात्यावरून त्याच्या मित्रांना मदत हवी असल्याची पोस्ट करत पैसे उकळण्यास सुरुवात केली. याबाबत फेसबुक अकाऊंट वापरणाऱ्या व्यक्तीला कळाल्यानंतर त्याने फेसबुक अकाऊंट ब्लाॅक करत, पोलिसांत मदतीसाठी धाव घेतली.

पोलिस तपासात जोधपूरहुन त्याचं अकाऊंट हॅक झाल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी सायबर तज्ज्ञाची मदत घेतली. त्यावेळी दिप्तेशने ही फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं. अधिक तपासात याच आयडीहून वर्सोवा, बोरिवली आणि वांद्रे येथे त्याने फसवणूक केली असून त्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद असल्याचं निदर्शनास आलं.

गुन्ह्यांची दिली कबुली

वांद्रे पोलिसांचं एक पथक जोधपूरला रवाना होत त्यांनी दिप्तेशला अटक केली. दिप्तेशने गुन्ह्यांची कबुली दिली असून चौकशीत त्याने नाशिक, पुणे, येथील नागरिकांचे फेसबुक, इन्स्टाग्राॅम आणि जीमेल अकाउंट हॅक केल्याचं पुढे आलं आहे. विशेष म्हणजे दिप्तेशचं शिक्षण फक्त दहावी झालं आहे. मात्र संगणाची त्याला पुरेपूर माहिती असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या